
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा देत परभणीत वक्तव्ये केली होती.
आक्रमक झालेल्या मुंडे समर्थकांनी जरांगे-पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आता जरांगे-पाटील यांच्यावर परळी, अंबाजोगाई येथे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. यावरून जरांगे-पाटील भडकल्याचे पाहायला मिळत आहेत.
संतोष देशमुख हे गावाचे प्रमुख आणि सरकारमधील एक घटक होते. संतोष देशमुख यांचा खून केल्यानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना अरेरावी करण्यात येते. त्याबद्दल बोलायचे नाही का? मग आम्ही कोणता जातीयवाद केला दाखवा बरं? असा संतप्त सवाल जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
जरांगे-पाटील म्हणाले, “आजपर्यंत मी राज्यातील एकाही जातीला दुखावले नाही. नेते कुणाचेच नसतात. नेत्यांना बोलायचं नाही? अशीच मस्ती करून द्यायची का? खून पाडायचे का? धनंजय देशमुखांचा देखील खून पाडण्याचा प्लॅन आहे का तुमचा? धनंजय देशमुखांच्या बाजूनं बोलायचं नाही का? कुठल्या वंजाऱ्याला, धनगर, दलित, मुस्लिमांना आम्ही बोललो नाही.”
“नेते गुंडगिरी सांभाळत आहेत. सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी एक टोळके नेटवर्क काम करत आहे. मग हे टोळके धमकी, अरेरावी, शिव्या देण्याची कामे करतात. हे सरकारला रोखायचं नाही का? सरकार रोखत नसले, तर जनता रोखणार ना… अरेरावी करणाऱ्यांना आम्ही बोललो, तर बाकीच्या समाजाला लागण्याची गरज काय?” असा प्रश्न जरांगे-पाटलांनी विचारला आहे.
संतोष देशमुखांचा खून दाबायचा होता. पण, आम्ही बसून आम्ही गुन्हा दाखल केला आणि आरोपींची नावे टाकून घेतली. मुंडेंच्या नेत्याविरुद्ध बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला नाही. तो गुन्हा दाखल झाल्यानं माझ्यावर जळजळ आहे. आतापर्यंत पाहिजेल तसे गुन्हे बीडमध्ये झाले आहेत. यांना कुणीही अटक करत नव्हते. नाचायचे तसे नाचत होते. कुणाचीही जागा, संपत्ती, कंत्राट हडपायचे, खंडण्या वसूल केले जात होते,” असा आरोप जरांगे-पाटलांनी केला आहे.