
मारेकऱ्यांनी तोंडावर लघुशंका केली”, सुरेश धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
बीडमधील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी फरार आहे. त्याशिवाय, देशमुख हत्या प्रकरणातील कळीचा मुद्दा ठरत असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याला सीआयडी कोठडी मिळाली आहे.
अमानुष मारहाणीने जखमी झालेल्या संतोष देशमुख यांनी मारेकऱ्यांकडे पाणी मागितले. पण, आरोपींनी त्यांना हीन पातळीची वागणूक दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह इतर नेत्यांनी लावून धरले आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. राज्यातही जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी त्यांचा अमानुष छळ केला. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सुरेश धस यांनी धक्कादायक दावा केला.
व्हिडीओ एसआयटीच्या हाती….
सरपंच संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा हा व्हिडीओ एसआयटीच्या हाती लागला आहे. आरोपीच्या फोनमध्ये हे व्हिडीओ होते. या व्हिडीओमध्ये संतोष देशमुखांना आरोपी मारहाण करत होते आणि आनंद लुटत होते, असे एसआयटीने कोर्टात सांगितले आहे. या संदर्भातील सगळे पुरावे एसआयटीने कोर्टत सादर केले आहेत. व्हिडिओ आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केले. त्यामुळे या प्रकरणात महत्वाचा पुरावा नष्ट झाला होता. परंतु एसआयटीने ते पुरावा रिकव्हर केला आहे. मोबाईलमधून डिलीट केलेला डाटा मिळवला असल्याचे एसआयटीने कोर्टात सांगितले.
संतोष देशमुखचे हाल केले, पाणी मागितलं तर…
सुरेश धस यांनी म्हटले की, कोर्टात आता काही गोष्टी उघड होत आहेत. पण, मी या गोष्टी सभागृहात सांगितल्या होत्या. संतोष देशमुख यांचा छळ करून त्याचे व्हिडीओ कोणाला तरी पाठवले जात होते. हे प्रकरण अतिशय हीन पातळीवरचे आहे. कौर्याच्या घटनांचा उल्लेख झाला तरी रक्त सळसळत करत आहे. त्यांनी गोळी घालून ठार केले असते तर लोकांमध्ये फार संताप नसता. पण, संतोषचा अमानुष छळ करण्यात आला. संतोषने पिण्यासाठी पाणी मागितले तर त्याच्या तोंडावर आरोपींनी लघुशंका केली असल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला. इतक्या विकृतपणे त्याला वागणूक दिली. सुदर्शन घुले, प्रतिक घुले ही सगळी टोळी अतिशय वाईट, विकृत आहे. संतोषला घेरून अमानुष मारहाण करण्यात आली असल्याचे धस यांनी सांगितले.
कोर्टात एसआयटीने काय सांगितले?
न्यायालयाला संतोष देशमुखांच्या हत्या करताना कोणती शस्त्रे वापरली याची देखील माहिती देण्यात आली आहे. संतोष देशमुखांच्या अपहरणानंतर त्यांच्या हत्येसाठी आरोपींनी मारहाण करताना 41 इंचाचा एक गॅसचा पाईप ज्याची एक बाजू काळ्या करदोड्याने मूठ तयार केली होती. लोखंडी तारेचे 5 क्लच वायर बसवलेली एक गोलाकार मूठ, एक लाकडी दांडा, तलवारीसारखं शस्त्र , चार लोखंडी रॉड आणि एक कोयता तसेत लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती देखील वापरली होती.