
विद्यार्थिनीच्या निधनाने अवघी शाळा हळहळली, शिक्षक अन् विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पाणी
जेवणाचे डबे तसेच पडून होते. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. शिक्षक विद्यार्थ्यांना जेवण करा, म्हणून सांगताना त्यांच्याही डोळ्यांत अश्रू मावत नव्हते.
छत्रपती संभाजीनगर : पक्ष्यांसारखा किलबिलाट करीत मधल्या सुटीत जेवणाच्या डब्यावर ताव मारणारे विद्यार्थी आज सुन्न झाले होते.
एकानेही जेवणाचा डबा उघडला नाही. त्यांच्यासह शिक्षकांच्याही (Teacher) डोळ्यांत अश्रू तरळत होते… कुणाचेही मन हेलावेल असे दृश्य विद्यार्थिनीच्या अचानक जाण्याने शिशुविहार शाळेत सोमवारी (ता. सहा) दिसून आले. राणी वाहुळे या विद्यार्थिनीसारखा हिरा कायमचा गमावल्याचे दुःख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.
अचानक श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या राणीचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. राणी दयानंद वाहुळे (वय १२, रा. नागेश्वरवाडी) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव. याबाबत शाळेतील शिक्षकांनी सांगितले, की कोरोनानंतर आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी राणी इयत्ता पाचवीमध्ये होती. या तपासणीमध्ये राणीच्या हृदयाला छिद्र असल्याचे निष्पन्न झाले होते, तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते. शाळेत ती सर्वांची आवडती विद्यार्थिनी होती.
शिक्षकदेखील तिची काळजी घ्यायचे. तिला आजारी असल्याचे शिक्षक कधीही भासू देत नव्हते. ती मात्र प्रत्येक उपक्रमात मित्र-मैत्रिणींसोबत सहभागी व्हायची. मात्र, सोमवारी सकाळी साडेनऊला तिच्या निधनाची वार्ता कळाली अन् संपूर्ण शाळा स्तब्ध झाली. शाळेत ही बातमी वाऱ्यासारखी विद्यार्थी व मित्र-मैत्रिणींपर्यंत पोचली. मधल्या सुटीतही एरवी किलबिलाट करणारे विद्यार्थी शांत होते.
जेवणाचे डबे तसेच पडून होते. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. शिक्षक विद्यार्थ्यांना जेवण करा, म्हणून सांगताना त्यांच्याही डोळ्यांत अश्रू मावत नव्हते. राणीने शाळेत केलेली धम्माल, मित्र-मैत्रिणींसोबत काढलेले सेल्फी अन् उपक्रमात घेतलेला सहभाग असे कितीतरी फोटो आज शाळेच्या प्रत्येक शिक्षकाच्या स्टेटसला होते. दोनच दिवसांपूर्वी शाळेत धमाल मस्ती करणारी राणी आज आपल्यात नाही, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.
शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन रद्द
शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन येत्या ११ तारखेला घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुषंगाने जय्यत तयारी सुरू होती. विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोचला होता. मात्र, या विद्यार्थिनीच्या अचानक मृत्यूमुळे वार्षिक स्नेहसंमेलन रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे संस्थेच्या उषा नाईक यांनी सांगितले.