
धनंजय मुंडेंचा राजीनामा…
भाजपचे आमदार सुरेश धस हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण सुरेश धस यांनी लावून धरले आहे.
सुरेश धस यांनी अजितदादांची सलग दोन दिवस भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांच्यावरही निशाणा साधत वाल्मिक कराडवर आरोप केले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरही धस यांनी वक्तव्य केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर बीडसह राज्यात संतापाची लाट उसळली. अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख यांना संपवण्यात आले. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. सुरेश धस यांच्याकडून मागील काही मोर्चांमध्ये धनंजय मुंडे लक्ष्य करण्यात येत होते. त्यानंतर धस यांनी आपल्या टीकेची तोफ उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वळवली. पुण्यातील जनआक्रोश मोर्चात सुरेश धस यांनी अजित पवारांवर ‘क्या हुआ तेरा वादा’ म्हणत निशाणा साधला होता. अजित पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
अजित पवारांच्या भेटीनंतर सुरेश धस काय म्हणाले?
अजित पवारांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी म्हटले की, वाल्मिक कराड हे गंभीर प्रकरण आहे. मोठ्या प्रमाणात गँग तयार करण्याचं काम वाल्मिक कराडने केले आहे. या गँगला मोक्का लावण्यात यावा अशी मागणीदेखील सुरेश धस यांनी केली. भविष्यात जे तिहार जेलमध्ये होतंय; सलमान बाबत जे मुंबईत होतंय ते पुढे महाराष्ट्रभरात होईल अशी भीती देखील सुरेश धस यांनी व्यक्त केली. बीडमधील काही पतसंस्था बुडाल्या, यात वाल्मिक कराडचा संबंध आहे. यात खाडे नावाचा पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे आढळून आला. त्यावेळी त्याच्या घरी कॅश सापडली. वाल्मिक कराडनं डिफेंडर गाडी घेतली. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी पैसे बुडवणाऱ्यांना पाठीशी घातलं हे उघड आहे असल्याचा आरोप धस यांनी केला.
सुरेश धस यांनी त्यांच्याच पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केली. पंकजाताईंनी 745 शिक्षकांची भरती सर्व नियम धाब्यावर बसवून केली असल्याचे धस यांनी म्हटले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर काय म्हणाले धस?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत बोलताना सुरेश धस म्हणाले की, मी कधीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. त्यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी मागे असलेल्या देवगिरी बंगल्यातील लोकांकडे आहे. बीडमध्ये नैतिकता नाही. मात्र, मी राजीनामा मागितलेला नाही असेही धस यांनी सांगितले.
अजित पवारांसोबतच्या भेटीबाबत बोलताना सुरेश धस म्हणाले की, माझ्या मतदारसंघात उपसा सिंचन योजनेकरता निधीची घोषणा करण्यात आली होती. भूसंपादनाचे पैसे लवकर मिळावेत याकरता अजित पवारांची भेट घेतली असल्याचे धस यांनी सांगितले