
कराडने वापरलेली ‘ती’ जीप ‘सीआयडी’कडून ताब्यात
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या, अवादा कंपनीच्या मस्साजोग (ता. केज) येथील प्रकल्पाकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचे प्रकरण आदी गुन्ह्यांमुळे जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्थेचा मुद्दा चव्हाट्यावर आला.
शिवाय आरोपी अनेक दिवस फरारी राहील्याने गृहखाते, सरकारलाही टिकेचा सामना करावा लागला.
आता या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना फरारी होण्यास, फरारी राहण्यास मदत करणारे तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. वाल्मिक कराडने ३१ डिसेंबरला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात शरण येताना वापरलेली जीप (स्कॉर्पिओ) ‘सीआयडी’ने जप्त केली आहे.
सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे यांना फरारी होण्यास मदत केल्यावरुन डॉ. संभाजी वायभसे व त्याच्या पत्नीची विशेष तपास पथकाने दोन दिवस चौकशी केली. घुले व सांगळेचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. त्यांना दोन दिवस ताब्यातही घेतले होते. हवे तेव्हा हजर व्हावे, अशी नोटीस बजावून पोलिसांनी त्यांना सोडून दिले होते. दरम्यान, वाल्मिक कराडला शरण येण्यासाठी वापरलेली जीप (एमएच २३ बीजी २२३१) पोलिसांनी जप्त केली आहे.
खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड घटनेनंतर २१ दिवस फरारी राहीला. त्याने या काळात तीन राज्यांत पर्यटन केले. तसेच, खुन प्रकरणातील घुले, सांगळे देखील घटनेनंतर २७ दिवसांनी पोलिसांना सापडले. तत्पूर्वी आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने टिकेची झोड उठली. संतापामुळे मोर्चेही निघाले. या काळात आरोपींना फरारी होण्यासाठी आणि फरारी राहण्यासाठी मदत करणारी मोठी साखळी कार्यान्वित होती, असा पोलिसांचा संशय आहे.
तपास करणाऱ्या पोलिस यंत्रणांनी आता दोन्ही मुख्य गुन्ह्यांतील प्रमुख आरोपींची अटक केल्यानंतर आता त्यांना मदत करणाऱ्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे. या काळात आरोपींना कोणी पैसे पुरविले, राहण्यासाठी कोणी मदत केली, सोबत कोण होते आदी विविध मुद्यांचा शोध गुन्हे अन्वेषण विभाग आणि विशेष तपास पथक करत आहे.