
तरुणाईच्या हाती पक्ष देण्याची शरद पवारांची घोषणा
जयंतराव : मी ८ दिवसांत राजीनामा देतो, तुम्ही किती काम केले सांगा
राष्ट्रवादीत फूट अटळ; नवे नेतृत्व आमदार रोहितकडे जाण्याचे संकेत
मुंबई-विधानसभा निवडणुकीत पराभवाची नामुष्की ओढवल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची दोनदिवसीय बैठक मुंबईत झाली.
गुरुवारी समारोपाच्या दिवशी शरद पवार यांनी पक्षाची पुढील दिशा स्पष्ट केली. यापुढे नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांना ५० टक्के तर खुल्या गटात ६० टक्के तरुणांना उमेदवारी दिली जाईल.
याशिवाय प्रस्थापित घराण्यांमधील युवकांना बाजूला ठेवून ७० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची घोषणाही त्यांनी केली. मात्र त्यापूर्वी पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी करत शरद पवारांसमोर जयंत पाटील यांना टार्गेट केले. त्यावर संतापलेल्या जयंतरावांनी ‘आधी निवडणुकीत तुम्ही काय काम केले त्याचा हिशेब द्या, मी आठ दिवसांत राजीनामा देतो,’ असे सुनावले. यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
‘राजीनामा मागणे सोपे असते. मात्र, चांगला माणू शोधणे कठीण असते. पक्ष चालवणे सोपे नाही. भाषणं करून उपयोग नसतो. डोके शांत ठेवून कार्यकर्त्यांना एकत्र करायचे असते. तुम्ही किती काम केले ते सांगा. प्रत्येक पदाधिकाऱ्याने दोन दिवसांत आपल्या वॉर्डात पक्षाला किती मते मिळवून दिली त्याचा डेटा द्या. मी ८ दिवसांत राजीनामा देतो,’ असे जयंतराव म्हणाले.
राष्ट्रवादीतील आमदार, खासदारांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या पक्षात विलीन होण्यासाठी शरद पवारांकडे आग्रह धरला होता. पुढची ५ वर्षे केंद्र व राज्यात सत्तेपासून दूर राहण्यापेक्षा एकत्र येण्याचा पर्याय चांगला असल्याचे त्यांचे मत आहे. मात्र जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांना हा पर्याय मान्य नाही. त्यामुळे या दोघांविरोधात पदाधिकाऱ्यांत संताप आहे. त्याचेच पडसाद शरद पवारांसमोर उमटले. राष्ट्रवादीचे नेते फार काळ सत्तेबाहेर राहू शकत नाहीत, हे शरद पवारही जाणून आहेत. तरीही लगेच अजित पवारांना शरण जाण्याचा मार्ग ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे अस्वस्थ झालेले दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते अजित पवार गटाकडे जाण्याचा मार्ग शोधत आहेत. यातून राष्ट्रवादीत पुन्हा फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. जे तरुण पदाधिकारी किंवा नेते शरद पवारांसोबत राहण्यास तयार आहेत त्यांना राष्ट्रवादीची प्रदेश पातळीवरील सूत्रे आमदार रोहित पवार किंवा रोहित आरआर पाटील यांच्यासारख्या तरुणांच्या हाती हवी आहेत. भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेने कायम वादग्रस्त ठरलेल्या जयंत पाटलांवर आता त्यांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच बैठकीत त्यांच्या संतापाचा स्फोट झाला.
विधानसभेत पक्षाचा मोठा पराभव झाला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यापूर्वी पक्षाला पूर्ण वेळ देऊ शकेल असा नवा प्रदेशाध्यक्ष द्या. सर्वच कार्यकारिणी बदलून नव्या, तरुण नेत्यांच्या हाती पक्षसंघटनेची जबाबदारी देण्यात यावी. मराठा नको तर इतर समाजाचा प्रदेशाध्यक्ष नियुक्त करावा,’ अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे केली.