
राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा!
बीडचे वातावरण तापत असतानाच महायुतीच्या प्रतिमेवर आणि राज्य सरकारच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत असल्याने आज महाराष्ट्रात येऊन आमदारांशी संवाद साधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या वेळी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहू नयेत यासाठी व सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होऊ नये, तसेच एवढा मोठा प्रकार घडूनही मोदींनी भेट घेतल्यानंतर मोदींनी या प्रकरणावर काहीच केले नाही असे होऊ नये, म्हणूनच धनंजय मुंडे यांना मुंबईतील महत्त्वाची बैठक असतानाही परळीला पाठवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मीक कराड प्रकरणात भारतीय जनता पक्षावर जनहिताचे दोषारोप येऊ नयेत म्हणूनच धनंजय मुंडे यांना मुंबईत महत्त्वाचे कार्यक्रम असताना देखील परळीला पाठवण्यात आल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत असून ते तब्बल अडीच तास राज्यातील महायुतीच्या आमदारांची संवाद साधणार आहेत.
वाल्मीक कराडला मकोका लागल्यानंतर परळीतील वातावरण बिघडले परळीत जाळपोळीच्या घटना घडल्या तसेच परळी बंद ठेवण्यात आली दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यास लागलेला वेळ, तपासातील दिरंगाई आणि महत्त्वाच्या एसआयटीच्या पथकामध्ये वाल्मीक कराडच्याच निकटवर्ती यांची लागलेली वर्णी आणि सत्ताधारी राजकीय नेत्यांकडून साधले जाणारे मौन या सगळ्या गोष्टीवर राज्य सरकारवर सामान्य जनतेतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्याचाच विचार करत आज मोदींची भेटीची महत्त्वाची वेळ असतानाही राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्याला त्यांच्या मतदारसंघात पाठवण्यात आले आहे.
वाल्मीक कराडची नवीन नवीन प्रकरणे बाहेर येत आहेत आणि यामध्ये निकटवर्तीय असलेले धनंजय मुंडे देखील जोडले जात आहेत. त्यामुळे एकूणच परिस्थितीचा विचार करता धनंजय मुंडे यांना मोदींच्या भेटीपासून दूर ठेवावे अशी चर्चा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये होत होती. या संदर्भात योग्य तो मेसेज पाठवल्यानंतर मुंडे यांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे असेही सांगितले जात आहे की परळीतील वातावरण सध्या बिघडले असून बीड जिल्ह्यातील या वातावरणात मधील शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुंडे यांना परळीला पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. काल मुंडे हे वाल्मीक कराडला मकोका लागल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटले होते. दहा मिनिटात अजित पवारांची भेट घेऊन ते परतले आणि त्यानंतर ते थेट परळीला गेले.