
सुप्रिया सुळे यांचा सवाल..!
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड पसार होत 21 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. पण त्यानंतर त्याने केज मधील खंडणी प्रकरणात पुणे सीबीआय कार्यालयामध्ये सरेंडर केलं.
यानंतर या प्रकरणाची पाळमुळे खोदण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी मागणी केली आहे. सुळे यांनी कराड याची या सर्व प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचा हात असून त्याने दहशतीच्या खाली लाखोंची मालमत्ता जमवल्याचा दावा केला जातोय. यामुळे सर्व प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून सतत होत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कराड याला ईडी का लावत नाही? असा सवाल सरकारला केला आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांन संदर्भात आज सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुळे म्हणाल्या, शहरात वाहतुकीचे नियोजन नाही. त्यामुळे वाहतुक कोंडी वाढलीय. त्यासोबतच उपनगरातील पाणी, कचरा या समस्या देखील सोडवल्या गेलेल्या नाहीत. या संदर्भात आज बैठक घेऊन चर्चा केली. तसेच या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी देखील केल्याचं सुळे यांनी सांगितले.
यावेळी, वाल्मिक कराड याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे आरोप करण्यात येत आहेत. याबाबत आपण शेतकऱ्यांकडून तक्रारीची माहिती घेणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक अशा प्रकारे होत असेल तर हे गंभीर आहे. सरकारने याबाबत चौकशी करून त्वरित कारवाई करावी.
वाल्मिक कराड वर झालेले आरोप गंभीर असून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून कारवाई करावी. मी मुख्यमंत्र्यांची संपर्क करून कारवाईची मागणी करणार असल्याचा देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितलं
वाल्मीक कराड यांच्या संपत्ती संदर्भात रोज विविध माहिती समोर येत आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचे कीती अकाउंट सील केले आणि त्यात किती पैसे होते याची माहिती समोर येणं आवश्यक आहे. यापूर्वी आयकीव माहितीवर अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ आणि इतर नेत्यांवर ईडी लावली. मात्र वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा नोंद असूनही ईडी का लावली जात नाही? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.