
कराडने रुग्णालयातून बाहेर पडताच विचारला प्रश्न, काय घडलं?
वाल्मीक कराडला मंगळवारी केज सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून त्याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. यामुळे बुधवारी पुन्हा एकदा त्याला बीडच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी त्याला रुग्णालयात नेलं होतं. सीआयडीने केलेला अर्ज कोर्टाने स्वीकारला आहे. वाल्मीक कराडला केज कोर्टात हजर केलं जाणार नाही. वाल्मीक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात होणार आहे.
न्यायालयात नेल्यानंतर वाल्मीक कराडने छातीत दुखत असल्याचं सांगितलं. त्यानंतर रुग्णालयात नेऊन त्याची तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर एडमिट करून घेण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलं. त्यामुळे कराडला पुन्हा कारागृहात नेलं गेलं.
रुग्णालयातून जेव्हा वाल्मीक कराड बाहेर पडला तेव्हा त्यावेळी पोलिसांची व्हॅन बाहेर उभा होती. रुग्णालयातून बाहेर येताच वाल्मीक कराडने रोहित कुठं आहे असा प्रश्न विचारला. दोन ते तीन वेळा वाल्मीक कराडने असा प्रश्न विचारल्यानं आता रोहित कोण याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, वाल्मीक कराडच्या अटकेनंतर परळीत अजूनही तणावाचं वातावरण आहे. वाल्मीक कराडवर खोटे गुन्हे दाखल केल्याचे आरोप करत एक कार्यकर्ता टॉवरवर चढला आहे. गुन्हे मागे घेत नाही तोवर मी उतरणार नाही असा पवित्रा कार्यकर्त्याने घेतला आहे. दुसरीकडे परळीत दुकाने आजही बंद ठेवण्यात आली आहेत.