
‘लाडकी बहीण’मुळे संजय गांधी निराधार व ‘श्रावणबाळ’च्या लाभार्थींनाअनुदानच नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांवर आता बोट ठेवले जात आहे. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो, असा निकष आहे. तरीपण, या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याने आता ६५ वर्षांपर्यंतच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेच्या महिला लाभार्थींना, यापैकी नेमका कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा, याचे स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे
सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जवळपास ७४ हजार लाभार्थी असून श्रावणबाळ योजनेचा लाभ जिल्ह्यातील एक लाख पाच हजारांहून अधिक लाभार्थी घेतात. दरमहा त्या लाभार्थींसाठी सुमारे २७ कोटी रुपयांचा निधी लागतो. मात्र, संजय गांधी निराधार योजनेतील खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना नोव्हेंबरचा लाभ मिळालेला नाही. याशिवाय डिसेंबर व जानेवारीचा निधी देखील शासनाकडून प्राप्त झालेला नाही.
निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थींकडून दरवर्षी हयात असल्याचा दाखला घेतला जातो. त्यासोबत आता लाभार्थींना स्वयंघोषणापत्र देखील द्यावे लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नाही आणि दोन्हीपैकी कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा, या बाबी त्यात समाविष्ट आहेत.
कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा याचे स्वयंघोषणापत्र घेतले जात आहे
संजय गांधी निराधार व श्रावाणबाळ योजनेचे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्यास त्यांना आता चालू योजनेचा लाभ नियमित सुरू ठेवायचा की लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे, यावर स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थींसाठी डिसेंबरच्या अनुदानाची मागणी केली आहे.
शिल्पा पाटील, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना, सोलापूर
सोलापुरातील निराधार योजनेच्या लाभार्थींची स्थिती
संजय गांधी निराधारचे लाभार्थी
७३,९४८
श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी
१,०५,५२०
एकूण लाभार्थी
१,७९,४६८
दरमहा अनुदानासाठी रक्कम
२६.९२ कोटी
दोन्ही योजनांचा लाभ १५०० रुपयेच
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थींना शासनाकडून दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ मिळतो. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम देखील तेवढीच आहे. पण, पुढे लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होईल, या आशेने अनेकजण संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ नको म्हणत असल्याची स्थिती आहे.