
रोहितचा विश्वविक्रम मोडत इतिहास घडवला!
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने टी-20 क्रिकेटमध्ये धमाका केला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडून मॅक्सवेलने टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे.
बिग बॅश लीग 2024-25 मध्ये ग्लेन मॅक्सवेल वादळी बॅटिंग करत आहे. बीबीएलच्या 40 व्या सामन्यात मेलबर्न स्टार्सने होबार्ट हरिकेन्सचा 40 रननी पराभव केला. या सामन्यात मेलबर्न स्टार्सकडून खेळताना मॅक्सवेलने 32 बॉलमध्ये 76 रनची खेळी केली, यामध्ये मॅक्सवेलने 5 फोर आणि 6 सिक्स ठोकले.
मॅक्सवेलच्या या वादळी खेळीच्या जोरावर मेलबर्न स्टार्सने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 219 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना होबार्ट हरिकेन्सना 19.3 ओव्हरमध्ये 179 रनच करता आले. या सामन्यात मॅक्सवेलला त्याच्या या खेळीबद्दल प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
मॅक्सवेलने मोडला रोहितचा विक्रम
टी-20 क्रिकेटमध्ये मॅक्सवेलने रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडला आहे. बीबीएलच्या 40 व्या सामन्यात मॅक्सवेलने फोर आणि सिक्सची आतषबाजी केली. मॅक्सवेलने त्याच्या या इनिंगमध्ये 6 सिक्स मारले, याचसोबत मॅक्सवेलने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे.
मॅक्सवेल आता टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातव्या क्रमांकावर आला आहे. मॅक्सवेलने 458 सामन्यांमध्ये 528 सिक्स मारले आहेत. तर रोहितच्या नावावर 448 मॅचच्या 435 इनिंगमध्ये 525 सिक्स आहेत.
पंजाब किंग्ससाठी खुशखबर
मॅक्सवेलने बीबीएलच्या या मोसमात धमाका केला आहे, त्यामुळे आयपीएलच्या पंजाब किंग्ससाठी ही खुशखबर असेल. आयपीएलच्या लिलावात पंजाब किंग्सने मॅक्सवेलला 4 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं आहे. आता मॅक्सवेल यंदाच्या मोसमात पंजाबसाठी किती फायदेशीर ठरतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.