
नेमकं काय घडलं?
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. ट्रम्प यांच्या आगमनामुळे सोन्याच्या भावापासून शेअर बाजारापर्यंत असे अनेक बदल होत आहेत.
राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि इतर देशांविरुद्ध व्यापार शुल्क लागू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही असे सांगितले. तरीही सोन्याच्या भावात वाढ सुरूच आहे, तर अमेरिकन डॉलरला नुकसान सहन करावे लागत आहे.
अमेरिकेतील निवडणुकीतील विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प काही देशांवर व्यापार शुल्क लादतील, अशी चर्चा गेल्या अनेक आठवड्यांपासून जगभरात सुरू होती. मात्र, सत्तांतर झाल्यानंतर त्यांनी यावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगून या मुद्द्यावर आणखी वेळ घेणार असल्याचे सांगितले.
यानंतर जागतिक शेअर बाजाराला दिलासा मिळाला आणि अमेरिकन डॉलरवर दबाव दिसून आला. दुसरीकडे डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या भावातही वाढ दिसून आली.
भारतात सोन्याच्या भावात वाढ
भारतात सोन्याच्या भावातील वाढीचा कल कायम आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, देशातील बहुतांश शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 81,300 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 75,000 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
गेल्या 3 वर्षात जगभरातील वाढत्या भौगोलिक-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. 2020 मध्ये सोन्याचा भाव 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता, जो आता 80,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. दुसरीकडे, अमेरिकेत ट्रम्प राजवट आल्यानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे.