
फक्त 49 रुपयात 6 फिल्म्स, पण कुठे पाहता येणार?
पुण्यातील सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.पुण्यात असाल तर तुम्ही फक्त 49 रुपयांमध्ये दर्जेदार मराठी चित्रपट पाहू शकता. पण हे चित्रपट पाहण्यासाठी संधी तुम्हाला केवळ दोन दिवस मिळणार आहे.
तुम्ही 22 आणि 23 जानेवारी रोजी पुण्यात असाल तर तुम्ही 49 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याच्या संधीचा फायदा घेऊ शकता. केवळ 49 रुपयांमध्ये पुण्यात मराठी चित्रपट कुठे पाहायचे? चित्रपटांचं वेळापत्रक काय? पाहूयात सगळ्याचे डिटेल्स.
पुण्यात 22 आणि 23 जानेवारी रोजी 49 रुपयांमध्ये मराठी चित्रपट पाहता येणार आहेत ते मराठी फिल्म असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट महोत्सवामध्ये. 22 आणि 23 जानेवारी रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. नुकतेच रिलीज झालेले काही दर्जेदार मराठी चित्रपट या महोत्सवात प्रेक्षकांना पाहण्यासाठी संधी मिळणार आहे.
10 चित्रपटांची खास स्क्रीनिंग
चित्रपट महोत्सवाचं आयोजक कौस्तुभ कुलकर्णी यांनी सांगितले की, महोत्सवात एकूण 10 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यामध्ये अलीकडेच प्रदर्शित झालेल्या पाणी पुरी, मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी, हॅशटॅग तदेव लग्नम, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, अल्याड पल्याड, आणि श्रीगणेश या चित्रपटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे चित्रपट केवळ 49 रुपयांत पाहता येणार आहेत.
चित्रपटगृहाऐवजी नाट्यगृहांतून दाखवण्याचा निर्णय
गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळत नाही, तसेच त्यांना चित्रपटगृहांमध्ये पुरेसा वेळ व स्क्रीनिंगची संधी मिळत नसल्याची खंत सिनेउद्योगातून व्यक्त होत आहे. त्यामुळेच नाट्यगृहांमध्ये या चित्रपटांचं स्क्रीनिंग करून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी सांगितलं.
प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
या महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर काही तासांतच 1200 पेक्षा जास्त तिकीटांची विक्री झाली आहे, असेही आयोजकांनी नमूद केले.
आयोजक पुढे म्हणाले,मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळत नाही, ही ओरड आता सामान्य झाली आहे. मराठी चित्रपटांना शो मिळाले तरी ते फार कमी प्रमाणात मिळतात आणि दोन-चार दिवसांत काढले जातात. त्यामुळे नाट्यगृहांमधून अशा महोत्सवाच्या माध्यमातून चित्रपट दाखवले गेले, तर प्रेक्षकांचा प्रतिसाद अधिक चांगला मिळेल. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या महोत्सवाचं आयोजन केलं आहे.