केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. यानंतर आता पुन्हा एकदा विरोधकांनी ईव्हीएम आणि मतपत्रिकेचा मुद्दा उचलून धरला आहे. अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी 23 जानेवारीला राजीनामा देणार असल्याची घोषणा केली.
तसेच, दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार असून बुधवारी (22 जानेवारी) दिल्ली गाठली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली
आमदार उत्तमराव जानकर यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, महाराष्ट्रात ईव्हीएमच्या माध्यमातून राज्याची वाट कशी लावली? तसेच आमच्या राज्यात मारकडवाडी, धानोरे या गावांमध्ये जो उठाव झाला. त्याचप्रकारचे वातावरण सर्व महाराष्ट्रात आहे. ईव्हीएम घोटाळ्याचा शोध घेतला पाहिजे. दिल्ली निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना दिल्लीमध्ये पकडायचे की, उद्या बिहार आणि गोवामध्ये ज्या निवडणुका आहेत, तिकडे पकडायचे? चोर हा कुठे ना कुठे पकडला जातोच. असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोग तसेच सरकारवर निशाणा साधला.
आमदार उत्तम जानकर म्हणाले की, संजय राऊत यांना तुरुंगात टाकले तरी त्यांनी संघर्ष केला आहे म्हणून त्यांना भेटायला आलो. आम्ही इतर पक्षाच्या नेत्यांना भेटणार आहोत. तसेच जंतर मंतरवर अधिवेशनापूर्वी आंदोलन करता येईल का? ते पाहत आहे. 25 जानेवारीला निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. पुढचे धोरण सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन ठरवू.असे ते म्हणाले. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना गुरुवारी मी भेटणार आहे. आम्ही भेट घेऊन नंतर सगळे पत्रकार परिषद घेऊ. कोणी नाही आले तरी मी एकटा जंतरमंतरवर बसणार आहे. असेही ते म्हणाले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उत्तमराव जानकर यांना, राज्यात काही गावांमध्ये हात उंचावून मतदान झाले, याबाबत विचारले. त्यावर ते म्हणाले की, धानोरे गावामधील लोकांना प्रश्न होता म्हणून त्यांनी ग्रामसभा घेऊन हात उंचावून मतदान घेतले. ईव्हीएम विरोधात आम्ही कित्येक दिवस झाले आंदोलन करत आहोत.
ईव्हीएमच्या जिवावर निवडणूक जिंकणे हा राष्ट्रद्रोह आहे. मी ज्या भागातून निवडून आलो, तेथील लोकांनी हे दाखवून दिले आहे. ही लढाई फक्त माझी नाही तर देशाची आहे. प्रत्येक लढाईला अशीच सुरुवात होते.असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचा उद्रेक आम्ही देशासमोर आणू. जिंकलेले अजून धक्क्यातून सावरलेले नाहीत. आम्ही कसे जिंकलो? आणि आम्ही कसे हरलो? असे दोन्ही बाजूंना धक्के बसले आहेत,असेही ते यावेळी म्हणाले.
