
उच्च न्यायालयाने ‘ते’ प्रकरण काढले निकाली; चित्रा वाघ यांनी दाखल केली होती जनहित याचिका
२०२१ मध्ये पुण्यातील एका तरुणीच्या मृत्यूवरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका न्यायालयाने गुरुवारी निकाली काढली आहे.
त्यावेळी त्यांचा पक्ष राज्यात विरोधी पक्षात असताना त्यांनी मंत्री संजय राठोड यांच्याशी कथित संबंध असलेल्या एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती.
पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टचा विचार करून न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हे प्रकरण बंद केले आहे, अशी माहिती देण्यात आल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने वाघ यांची याचिका निकाली काढली.
२०२१ मध्ये पुण्यातील एका तरुणीनेच्या मृत्येूने राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यावेळी तत्कालीन मंंत्री संजय राठोड यांना विरोधकांनी लक्ष्य केले होते. तसेच भाजपच्या चित्रा वाघ यांनी देखील राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यावेळी मंत्री संजय राठोड महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होती. या प्रकरणावरून नंतर त्यांना राजीनामाही द्यावा लागला होता. उच्च न्यायालयातील याचिका निकाली निघाल्याने मृदा आणि जलसंवर्धन मंत्री संजय राठोड यांना दिलासा मिळाला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीच्या गच्चीवरून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला होता. ही घटना ७ फेब्रुवारी २०२१ रोजी घडली होती. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. त्यावेळी तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी या प्रकरणावरून राठोड यांना लक्ष्य केले होते. विरोधकांनी रान पेटवल्यानंतर काही काळ राठोड नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी राठोड यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता. विरोधपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्याने त्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते.