
काल ज्याने हैराण केले, त्या गोलंदाजाला धुतले
फॉर्म मिळवण्यासाठी रणजी करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या रोहित शर्माला काल अडखळताना पाहिले होते. जम्मू-काश्मीरचा गोलंदाज उमर नजीरच्या १३ चेंडूंत रोहितला एकही धाव करता आली नव्हती आणि तो ३ धावांवर बाद झाला.
पण, आज रोहित वेगळ्याच अंदाजात दिसला. त्याने उमर नजीरच्या एका षटकात ६,४,४ असे फटके खेचले. यशस्वी जैस्वालनेही चांगली फटकेबाजी केली.
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे हे आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू काल जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांसमोर अपयशी ठरले. उमर नजीरने वेगवान माऱ्याने रोहितला हैराण केले आणि त्याच्यासह युधवीर सिंग यानेही ४ विकेट्स घेताना मुंबईचा पहिला डाव १२० धावांवर गुंडाळला. जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात केली होती. सलामीवीर शुभम खजुरियाने ७५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली.
यावेल हसन ( २९), अब्दुल समद ( १९), कर्णधार डोग्रा ( १९) यांना मोठी खेळी करता आली नाही. मोहित अवस्थीने मुंबईला सामन्यात पुनरागमन करून दिली होते. पण,अबीड मुश्ताकच्या ४४ धावांनी जम्मू-काश्मीरला आघाडी मिळवून दिली. जम्मूने पहिल्या डावात २०६ धावा करून ८६ धावांची आघाडी घेतली. मुंबईच्या मोहितने ५२ धावांत ५ विकेट्स घेतल्या. शार्दूल ठाकूर व शाम्स मुलानी यांनी प्रत्येकी २ बळी टिपले.
रोहित आज आक्रमक मूडमध्ये होता. तो पुढे येऊन फटके खेचतोय आणि त्याने उमरच्या चेंडूवर मारलेला पुल शॉट चेंडूला मैदानाबाहेर भिरकावणारा होता. त्यानंतर त्याने नबीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मारलेला षटकार पाहण्यासारखा होता. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर रोहितने प्रथमच डावात २० हून अधिक धावा केल्या आहेत. रोहित- यशस्वीने १० षटकांत ५२ धावा जोडल्या. रोहित २८ धावांवर नाबाद आहे आणि त्यात ३ षटकार व २ चौकारांचा समावेश आहे. यशस्वीनेही नाबाद २३ धावा केल्या आहेत.
रोहितने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०८ सामन्यांत ९२८७ धावा केल्या आहेत. त्यात ३८ अर्धशतकं व २९ शतकांचा समावेश आहे. नाबाद ३०९ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.