महादेव मुंडे खून प्रकरणात साटेलोटे असल्याचा आरोप
सरपंच संतोष देशमुख अपहरण व खून, पवनचक्की खंडणी, वाळू, परळीतील राख, पीक विमा गैरव्यवहार आदी मुद्द्यांवरून आतापर्यंत मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराडला घेरणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आता आपला मोर्चा वाल्मिकची मुले श्री व सुशिल कराड तसेच परळी पोलिसांकडे वळविला आहे.
पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणी शुक्रवारी पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी कराडची मुले व परळी पोलिसांमध्ये १५० वेळा फोन झाल्याचा गंभीर आरोप केला. धस यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख व शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनाही फैलावर घेतले.
महादेव मुंडे यांच्या खुनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी करत वाल्मीक कराडनेच पोलिस निरीक्षक शेख यांना या पदावर बसविल्याने त्यांना तपासातून बाजूला ठेवण्याचीही मागणीही त्यांनी केली. महादेव दत्तात्रेय मुंडे यांचा १४ महिन्यांपूर्वी परळीत खून झाला होता. अद्याप त्याचा तपास झालेला नाही.
परळीतील सर्व अधिकारी व कर्मचारी वाल्मीक कराडने निवडलेले असल्याने तपास होत नसल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी गोविंद भताने, संजय सानप, भास्कर केंद्रे, विष्णू फड याच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे सर्व गुन्ह्यांच्या तपासात कशी, असा सवाल केला. केंद्रे १५ वर्षांपासून परळीतच असल्याचेही धस म्हणाले.
पुण्याहून आलेल्या सायबर तज्ज्ञ अतुल दुबे यांनी वाल्मीक कराडची मुले श्री कराड व सुशिल कराड यांच्या घरातून खुनाच्या घटनेच्या वेळी १५० वेळा फोन केल्याचा अहवाल दिल्याचेही धस म्हणाले.
