
आधी कोणत्याही वेळेत 16 वर्षांखालील मुलांना थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी कोणतेही नियम नव्हते. पण आता 16 वर्षांखालील मुलांना सिनेमा ठराविक वेळेत दाखवता येणार आहेत. तेलंगणा उच्च न्यायालयाने 16 वर्षांखालील मुलांना थिएटर, मल्टिप्लेक्समध्ये सकाळी 11 वाजण्यापूर्वी आणि रात्री 11 नंतर सिनेमा पाहण्यास बंदी घातली आहे.सिनेमा तिकीट दरात वाढ आणि विशेष शोसाठी परवानग्यांसंबंधीच्या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला.
न्यायमूर्ती विजयसेन रेड्डीयांनी टिपणी केली की मुलांना सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा सिनेमा पाहण्याची परवानगी दिल्याने त्यांच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून आता सिनेमा पाहण्यासाठी मुलांना वेळेचं बंधन असणार आहे.
कोर्टाने काय सांगितलं?
‘पुष्पा 2’ सिनेमाच्या प्रिमियर दरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलाचा मृत्यू झाला तर, महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला… याच घटनेचा उल्लेख करत विजयसेन रेड्डी म्हणाले, ‘सिनेमॅटोग्राफीच्या नियमांनुसार, मुलांना सकाळी 8.40 च्या आधी आणि दुपारी 1.30 नंतर सिनेमा पाहण्याची परवानगी दिली जाऊ नये. मुलांना सकाळी लवकर आणि रात्री उशिरा सिनेमा पाहू देऊ नये.’
चित्रपटगृहे आणि मल्टिप्लेक्समध्ये 11 वाजण्यापूर्वी आणि रात्री 11 नंतर 16 वर्षांखालील मुलांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व पक्षांना द्यावेत, अशी शिफारस उच्च न्यायालयाने केली आहे. मुलांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचा सल्ला प्रधान सचिव, गृह विभाग यांना देण्यात आला.
शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर होतायेत वाईट परिणाम – कोर्ट
न्यायमूर्ती रेड्डी यांनी रात्री उशिरा स्क्रीनच्या अतिवापराचा मुलांवर होणाऱ्या परिणामाबाबत चिंता व्यक्त केली. याचिकाकर्त्यांच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. मध्यरात्री आणि सकाळी – सकाळी मुलांना सिनेमा पाहण्यास परवानगी दिल्यानंतर त्यांच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर वाईट परिणाम होतात.
याचिकाकर्त्याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, विषम वेळेत सिनेमा पाहिल्यास मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. न्यायालयाने आपला निर्णय देण्यापूर्वी या समस्यांचा विचार केला. आता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.