
MPSC परीक्षेत मिळवलं घवघवीत यश
बीड प्रतिनिधी: जिद्द, चिकाटी आणि मेहनत यांच्या जोरावर कोणतंही लक्ष्य साधता येतं. राज्यातील परळी शहरातल्या एका अत्यंत सामान्य कुटुंबातल्या आरती बोकरेनं हे सिद्ध करून दाखवलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत आरतीला कमालीचं यश मिळालं असून ती आता अन्न व औषध अधिक अधिकारी बनली आहे
आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटावा असं काहीतरी करण्याची इच्छा आणि समाजासाठी काम करण्याची जिद्द मनाशी बाळगून आरतीने 2023 मध्ये स्पर्धा परीक्षा दिली होती. विविध क्लासेस आणि अनुभवी शिक्षकांची मदत मिळूनही भल्याभल्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत नाही. मात्र आरतीने फक्त मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिचं स्वप्न पूर्ण केलं. लोकसेवा आयोगामार्फत तिला अन्न आणि औषध विभागाची जवाबदारी मिळणार असून परळी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा आरतीने रोवला आहे.
आरतीने 2023 मध्ये ही परीक्षा दिली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. हा निकाल पाहून केवळ आरती आणि तिचे कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण परळी शहरवासी आनंदी झाले आहेत. आरती बोकरे ही परळी शहरातील भीमनगरमधील सर्वसामान्य कुटुंबातील असून तिचे वडील एका खाजगी दुकानात हमाल म्हणून काम करतात. तर तिची आई महापारेषण वीज पुरवठा केंद्रात कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करते. कोणत्याही क्लास आणि कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आरतीने स्वत:च्या बळावर हे यश संपादित केलं आहे.
आरतीच्या या यशाचा परळीकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना अभिमान आहे. भीमनगरमधील अनेक विद्यार्थी आणि मुलींना तिचा आदर्श मिळणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातून येऊन तिने ही गरुड झेप घेतली आहे. जिद्दीच्या जोरावर आणि हलाखीच्या परिस्थितीवर मात करू तिने स्वतःचं आणि समाजासाठी काम करण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. या वाटचालीत तिच्या कुटुंबाने तिची पूर्ण साथ दिली. आरतीला कशाचीही कमी पडू न देता तिच्या पाठिशी ते खंबीरपणे उभे राहिले. या यशाबद्दल आरतीचं सर्वच स्तरांततून कौतुक होत आहे.