
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा संताप
गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगा संदर्भात आक्षेपार्ह विधान केलं होतं.
त्या विधानावरून त्यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर अभिनेता हेमंत ढोमे, अमोल कोल्हे, इतिहासकार, शिवाजी महाराजांवर अभ्यास करणारे अभ्यासक, राजकीय संघटना यांनी देखील आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर त्यांनी या वक्तव्यासाठी माफी मागितली आहे. मात्र, ही माफी सुद्धा शिवप्रेमींच्या भावनांशी खेळ असल्याचा संताप इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी लोकल18 शी बोलताना व्यक्त केलाय.
माफी मनात हेतू ठेवून मागितलेली..
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफीनामा जाहीर केला. या माफीनाम्यावर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल सोलापूरकर यांनी तो माफीनामा हा हेतू ठेवून जाहीर केला आहे. त्यांनी ही माफी स्वच्छ आणि निर्मळ मनाने मागितलेली नाही. त्यांनी माफी मागतानाही केलेल्या वक्तव्याचे पुरावे आहेत असं म्हटलंय. यावर सोलापूरकर यांच्याजवळ असणारे पुरावे लवकरात लवकर
समाजासमोर सादर करावेत. अनेक वर्षांपासून इतिहास संशोधनात कार्यरत असणाऱ्यांना आणि शिवप्रेमींना जे पुरावे मिळाले नाहीत ते पुरावे सोलापूरकर यांच्याकडे असतील तर त्यांनी समाजासमोर मांडावेत, असं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्हटलंय.
शिवरायांचा अवमान करणारं विधान
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांनी आपला माफीनामा जाहीर केला. यावर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्यावरून सुटका मोहिमेच्या सर्व नोंदी या समकालीन पुस्तकात आहेत. याच्या सर्व नोंदी इतिहासात आढळतात. या नोंदी साधारण शेकडो वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या आहेत. तसेच शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून सुटताना लाच दिलेली इतिहासात कोणतीही नोंद नाही. राहुल सोलापूरकर यांनी गंमत म्हणून हे विधान केले असं म्हटलं आहे. मात्र, सोलापूरकरांचं हे विधान चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका ही इतिहासातील सर्वात मोठी सुटका आहे. याला द ग्रेट एस्केप असंही म्हटलं गेलं आहे.
राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करणं आणि शाहूंचे विचार आत्मसात करणं यामध्ये खूप फरक आहे. राहुल सोलापूरकर यांनी यापूर्वी मनुस्मृतीचं समर्थन करणारी विधानं केली आहेत. शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल कथात्मक इतिहास सांगत असतात. मात्र, इतिहासात त्याला काहीही आधार नाही. भूमिका साकारणे आणि इतिहासाचा अभ्यास असणं या दोन वेगळ्या भूमिका आहेत. शिवाजी महाराजांच्या महानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं सोलापूरकर यांचं विधान आहे. गंमत म्हणून चुकीच्या पद्धतीनं इतिहास सांगणं थांबवलं पाहिजे, असं देखील सावंत यांनी म्हटलंय.