
गुलेन बॅरी सिंड्रोम या मेंदूविषयक आजाराच्या 8 नवीन रुग्णांची सोमवारी नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 192 इतकी झाली आहे. जीबीएसमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृत रुग्णांची संख्या 7 वर पोहोचली आहे.
त्यापैकी 6 मृत्यू पुणे जिल्ह्यातील आणि 1 मृत्यू सोलापूर जिल्ह्यातील आहे. जीबीएसमधून बरे झालेल्या 91 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, 192 रुग्णांपैकी 91 रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. तसेच, 39 रुग्ण पुणे मनपा, 29 रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा, 25 रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील आणि 8 रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत. सध्या 48 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
पुणे मनपा आणि जिल्ह्यातील बाधित भागांमध्ये सर्वेक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत पुणे मनपामधील 46 हजार 534 घरे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 25 हजार 218 घरे, पुणे ग्रामीणमधील 13 हजार 374 घरे अशा एकूण 85 हजार 126 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहेत.
पाणी नमुने पिण्यास अयोग्य
शहराच्या विविध भागांमधील 4769 पाणी नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 65 पाणी नमुन्यांचे स्रोत पिण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे.
अँटीबॉडी तपासणीसाठी निम्हान्सकडे 82 सिरम नमुने पाठवण्यात आले आहेत.
बिबवेवाडीतील पुरुषाचा मृत्यू
बिबवेवाडी येथील 37 वर्षीय पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. वाहनचालक असलेल्या या रुग्णास 31 जानेवारीपासून त्रास सुरू झाला. त्याला भारती हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणल्यावर त्याचा एमआरआय करण्यात आला. नातेवाइकांनी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर 1 फेब-ुवारी रोजी त्याला नातेवाइकांनी निपाणी येथे नेले. रुग्णाचा त्रास वाढल्याने त्याला सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याची नर्व्ह कंडक्शन तपासणी करून जीबीएसचे उपचार सुरू करण्यात आले.
उपचार सुरू असतानाच 5 फेब-ुवारी रोजी नातेवाइकांनी वैद्यकीय सल्ल्याविरुध्द डिस्चार्ज (डामा डिस्चार्ज) घेतला. त्याच दिवशी त्याला पुन्हा पुण्यात आणून संध्याकाळी कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. 9 फेब-ुवारी रोजी रुग्णाला कार्डिअॅक अरेस्टचा त्रास झाला. त्याला 30 मिनिटे सीपीआर देण्यात आला. उपचारांदरम्यान रात्री 10 वाजता रुग्णाचा मृत्यू झाला, असे मृत्यू अहवालात नमूद करण्यात आले आहे.