
राधाकृष्ण विखेंची शरद पवारांवर टीका…
राज्यात जाणते राजे म्हणवणारे नेते सांगोला, माण-खटाव या दुष्काळात पाणी आणणे सोयीचे होणार नाही, असं बोलले होते. तुतारी फुंकून कुठे पाणी येत नसतं, त्यासाठी रात्रंदिवस काम करावे लागते.
तेच काम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत,” असं वक्तव्य भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कामाचे भूमिपूजन विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
विखे-पाटील पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळातून आता मुक्त झाला पाहिजे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचे काम सुरू होणार असल्याने १२ गावांतील सुमारे १५ हजार ४०० हेक्टर जमिनींना बंदिस्त नलिकेद्वारे शेतीला लवकरच कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपून तीन वर्षात तालुका शंभर टक्के दुष्काळमुक्त होणार आहे,असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सांगोला तालुक्यातील पिढ्यान्पिढ्या दुष्काळाशी संघर्ष करीत असणारा शेतकरी दुष्काळ संपवण्यासाठी आस लावून बसलेला आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कामांमुळे सांगोला तालुका पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे.
दरम्यान, भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ. बाबासाहेब देशमुख, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार शहाजीबापू पाटील, दीपक साळुंखे पाटील, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. एच. टी. धुमाळ, भीमा कालवा अधीक्षक अभियंता धीरज साळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.