
अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट…
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटामुळे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हेंनी मालिकेच्या अंतिम भागाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
मालिकेचा शेवट वेगळ्या पद्धतीने दाखवण्यासाठी दबाव होता का ?
‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांवर झालेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. मात्र, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत हे दृश्य दाखवण्यात आले नव्हते. याबाबत बोलताना अमोल कोल्हेंनी सांगितले की, “मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे दृश्य न दाखवण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव होता. माध्यमांकडूनही हा दबाव येत होता.
नैतिक जबाबदारी आणि सामाजिक परिणाम
अमोल कोल्हे म्हणाले, टेलिव्हिजनवर मालिका दाखवताना काही नियम आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असते. त्या नियमांमुळेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान दाखवू नये असा दबाव होता. दुसरीकडे नैतिकतेचाही प्रश्न होता. सलग 40 दिवस मालिकेतून महाराजांचे बलिदान दाखवणे म्हणजे प्रत्येक घरातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच याचा मानसिक त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेऊन आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.
टीकेला उत्तर…
कोल्हेंनी पुढे सांगितले की, आम्ही नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन निर्णय घेतला तरी आमच्यावर टीका झाली. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान दाखवल्याने तुम्हाला कोणता आनंद मिळाला असता, असा प्रश्न मी माझ्यावर टीका करणाऱ्यांना विचारतो. मला अशा लोकांची कीव येते.
शरद पवारांनी सूचना दिल्या होत्या का ?
अमोल कोल्हेंनी स्पष्ट केले की, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा, अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती. शरद पवारांनी ही मालिका कोरोना काळात झालेल्या पुनर्प्रक्षेपणादरम्यान पाहिली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात मालिकेत काय दाखवले जात होते याची त्यांना कल्पना नव्हती.
चित्रपट आणि मालिका या दोन्ही माध्यमात फरक
अमोल कोल्हेंनी शेवटी सांगितले की, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट सध्या गाजत आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहून प्रेक्षक भावूक झाले आहेत. मात्र, माध्यमांच्या दबावामुळे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत तो भाग दाखवता आला नाही. चित्रपट आणि मालिका या दोन्ही माध्यमात आणि त्यांच्या प्रेक्षकवर्गात खूप फरक आहे.