
मुख्यमंत्री फडणवीसांचे नाव घेत इंद्रजीत सावंतांना जीवे मारण्याची धमकी…
कोल्हापुर : कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती खुद्द इंद्रजीत सावंत यांनी दिली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सावंत यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्यांनी संबंधित व्यक्तीचे आणि त्यांचे कॉल रेकॉर्डिंग शेअर केली आहे. यामध्ये अज्ञातांकडून सावंत हे ब्राह्मण समाजाबाबत द्वेष पसरत असल्याचा आरोप करत त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संबंधित कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये धमकी देणारा व्यक्ती सावंत यांना शिवीगाळ देखील करत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत देखील अवमानकारक भाषेचा वापर या व्यक्तीने केल्याचा दावा सावंत यांनी केला आहे.
डॉ. प्रशांत कोरटकर असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव असल्याचं सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत हे सातत्याने समाज माध्यमात आपली रोखठोक भूमिका मांडत असतात. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाबद्दल त्यांनी आपली भूमिका मांडली होती.
रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय?
ही भूमिका मांडल्यानंतर त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे त्याने फोन करून सावंत यांना थेट धमकी दिली आहे. “जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा”, असं म्हणत या व्यक्तीने सावंतांना अर्वांच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. तसंच घरात येऊन मारण्याची देखील धमकी देण्यात आली आहे. सध्या हे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असलेल्या दिसून येत आहे.