
जोरदार हंगामा…
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो हटवल्याचे समोर आले आहे. दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी याबाबत एक फोटो प्रसिध्द करत रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला चढवला.
त्यावरून विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात जोरदार हंगामा झाला.
दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री कार्यालयात आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो लावले होते. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्याच मागे हे फोटो होते. आतिशी मुख्यमंत्री झाल्यानंतरही तेच फोटो कार्यालयात होते. आता भाजपची सत्ता आल्यानंतर हेच फोटो कायम राहणार का, याबाबत उत्सुकता होती.
अखेर रेखा गुप्ता यांनी हे दोन्ही फोटो हटवले आहेत. त्याजागी महात्मा गांधी, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यावरून आपने भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्यावर विधानसभेत जोरदार हंगामा झाला. विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आपच्या इतर आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आपच्या घोषणाबाजीनंतर भाजपच्या आमदारांनीही उभे राहून त्याला विरोध करत भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांना काही काळासाठी कामकाज तहकूब करावे लागले. दरम्यान, आपने यावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. आतिशी यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही टीका केली. ते म्हणाले, दिल्लीच्या नवीन भाजप सरकारने बाबासाहेबांचा फोटो हटवून पंतप्रधान मोदींचा फोटो लावला आहे. हे योग्य नाही. यामुळे बाबासाहेबांच्या कोट्यवधी अनुयायींच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपला माझी प्रार्थना आहे की, पंतप्रधानांचा फोटो लावा, पण बाबासाहेबांचा फोटो हटवू नका, त्यांचा फोटो असूद्या, असे केजरीवालांनी म्हटले आहे.
दरम्यान, वाद निर्माण झाल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री कार्यालयाचा फोटो एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्र्याच्या खुर्चीच्या मागील भिंतीवर राष्ट्रपती, महात्मा गांधी तर पंतप्रधान मोदींचे फोटो दिसत आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो आहेत. याचाच अर्थ रेखा गुप्ता यांनी आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या फोटोंची केवळ जागा बदलली आहे, असे स्पष्ट होते.