
वर्षभरापूर्वी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात झालेल्या गोळीबाराने सगळ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. तत्कालिन भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच 6 राऊंड फायर केले होते.
पोलीस स्टेशनमध्ये एका आमदाराच्या अशा वर्तनाने सगळा महाराष्ट्र हादरला होता. कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. या प्रकरणी गणपत गायकवाड अजूनही तुरुंगात आहेत. पण आता या प्रकरणाला एक नवीन वळण लागलं आहे.
गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला क्लिन चीट देण्यात आली आहे. आरोपपत्रात फक्त दोन आरोपींचा समावेश करण्यात आला आहे. गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच सहा राऊंड फायर केले होते. ही घटना घडली त्यावेळी गणपत गायकवाड कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. आता त्यांची पत्नी सुलभा गायकवाड आमदार आहेत.
चार्जशीटमध्ये काय म्हटलय?
या प्रकरणी उल्हासनगर कोर्टात पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. यात फक्त दोन आरोपींचा समावेश आहे. नागेश बडेराव आणि कुणाल पाटील. चार्जशीटमध्ये नमूद केल्यानुसार, वैभव गायकवाड याच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नाहीत आणि त्याचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, वैभव गायकवाड अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
25 हजारांचे बक्षिस देण्याची घोषणा केलेली
मागच्या महिन्यात महेश गायकवाड यांनी मोठी घोषणा केली होती. वैभव गायकवाड याला पकडून देणाऱ्या पोलिसांना 25 हजारांचे बक्षिस देण्याची घोषणा त्यांनी केली होती. गुन्ह्यातील आरोपी आमदाराच्या फार्म हाऊसवर जात असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला होता. पोलीस राजकीय दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळे वैभव गायकवाड याला अद्याप अटक झालेली नाही. त्याला पकडून देणाऱ्या पोलिसांना 25 हजार रुपयांचे बक्षीस माझ्यातर्फे दिले जाईल. ही बक्षीसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली जाईल, असे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी जाहीर केले होते.