
हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री. प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते.
महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवभक्त महादेवाची मोठया भक्ती भावाने पूजा करतात आणि उपवास करतात. तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप देखील यादिवशी केले जाते. तसेच रात्रीच्या जागरणाचे विशेष महत्त्व आहे, म्हणूनच या दिवसाला महाशिवरात्री म्हणतात. याचदिवशी भगवान शिवाची नगरी असलेल्या काशीमध्ये महाशिवरात्रीचा एक वेगळेच आनंददायी वातावरण असते. पवित्र अशा काशीला मोक्षनगरी असेही म्हणतात.
असे मानले जाते की हे शहर भगवान शंकराच्या त्रिशूळावर विराजमान आहे आणि महादेवाचा या शहरावर विशेष आशीर्वाद आहे. काशीमध्ये भगवान शिवाची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. तसेच काशीमध्ये महाशिवरात्री साजरी करण्याची एक विशेष परंपरा आहे. नेमकी महाशिवरात्र कशी साजरी करतात आणि त्याची सुरुवात कशी सुरु झाली ते जाणून घेऊयात.
काशीमध्ये महाशिवरात्री कशी साजरी केली जाते ?
काशीमध्ये भगवान शिवाची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यापैकी एक काशी विश्वनाथ मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. वाराणसीच्या मंदिरांमध्ये भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी दूध, दही, तूप, मध, पाणी इत्यादींनी अभिषेक केला जातो. त्यानंतर मंगल आरती केली जाते आणि त्यानंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातात. यावेळी भगवान शिवाची शयन आरती होईपर्यंत दरवाजे भाविकभक्तांसाठी दर्शनासाठी उघडे राहतात. याशिवाय काशीच्या या मंदिरात रात्रीच्या चारही तासांमध्ये शिवलिंगाची पूजा केली जाते.
काशीमध्ये महादेव शिव आणि पार्वती माता यांची लग्नासारखी वाजत गाजत वरात निघते
असे म्हटले जाते की फाल्गुन महिन्यातील महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता, म्हणून शिवरात्रीच्या दिवशी काशी, उज्जैन वैद्यनाथ धामसह सर्व ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये आपल्या माणसांच्या लग्नासारखी देवांचीही वाजत गाजत वरात निघते. त्यासाठी महाशिवरात्रीच्या काही दिवस आधी, मंदिरांमध्ये भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या लग्नाची तयारी केली जाते जसे की हळदीचा कार्यक्रम तसेच लग्नाच्या आधीच्या अनेक विधी देखील या दिवसांमध्ये सुरू असते.