
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून चांगलाच वाद पेटला आहे.
दोन मर्सिडीज मिळाल्या की पदे मिळतात, असे विधान त्यांनी केले. नीलम गोऱ्हे यांच्या या विधानाप्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला असून जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी नीलम गोऱ्हेंची बाजू घेत आहेत. याप्रकरणी आता प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, नीलम गोऱ्हे यांनी जर उद्धव ठाकरे यांना मर्सिडीज गाड्या दिल्या असतील तर कोणत्या क्रमांकाच्या दिल्या हे त्यांनी सांगितले पाहिजे. खरं म्हणजे आम्हाला नीलम गोऱ्हे यांच्याकडून या अपेक्षा नाहीत. त्या उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलल्या म्हणून मी बोलत नाही. परंतु कोणत्याही नेत्याने कोणत्याही नेत्यांच्या विरोधात बोलण्याआधी काही संदर्भ किंवा पुरावे दिले पाहिजेत. पण आपण कोणतेही पुरावे न देताबोलत असू तर ते योग्य नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी स्पष्ट केली.
बच्चू कडू म्हणाले की, जर नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना खरंच गाडी दिली असेल तर कोणती गाडी दिली ते त्यांनी सांगावं आणि गुन्हा दाखल करावा. नीलम गोऱ्हे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण नीलम गोऱ्हे या उपसभापती आहेत. त्यामुळे त्यांनी असे बिनबुडाचे आरोप करू नयेत. पण उद्धव ठाकरे यांनी खरंच गाड्या घेतल्या असतील तर नीलम गोऱ्हे यांनी रणरागिणी सारखं समोर आलं पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली..
दिल्लीमध्ये 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. या संमेलनाच्या “असे घडलो आम्ही” या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्याकी, ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची. गल्ला गोळा करण्याचे काम एकनाथ शिंदेंना देण्यात आले होते, अशी माहिती नीलम गोऱ्हेंनी दिली. गोऱ्हेंनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर नीलम गोऱ्हे यांनी काही तासांमध्येच उद्धव ठाकरेंवर आरोप केलेल्या आरोपाबाबत सारवासारव केली.