
राज्यात केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी असुरक्षित – राऊतांनी फटकारलं
महाराष्ट्रात तुम्ही सत्तेचा बळावर काय पेरताय ? हे सगळे लोक, जिथे सत्ता तिथे बलात्कारी, खुनी आणि व्यभिचारी. राज्यात जर केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नसेल तर या राज्यामधल्या सामान्य घरातील लेकीबाळींची काय परिस्थिती असेल ?
नुसतं लाडकी बहीण, लाडकी बहीण करून, लाडका भाऊ करून काय उपयोग ? नुसते खुळखुळे वाजवून फार काळ तुम्हाला इथे राहता येणार नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. रोज लाडक्या बहिणीची विनयभंग होतोय, रक्षा खडसे यांच्या घरातील घटनेमुळे हे परत एकदा समोर आलं आहे, असे म्हणत राऊतांनी सरकारला कानपिचक्या दिल्या.
तुम्ही काय करताय ? बीडमध्ये ज्यांचा खून झाला त्यांची पत्नी आणि मुलगी पुन्हा उपोषणाल बसत आहेत, ती तुमची लाडकी बहीण नाही का ? असा सवालही राऊतांनी विचारला.
त्यासाठीच ते अमित शहांना भेटले
अर्थसंकल्पीय अधइवेशनापूर्वी काल झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान एकनाथ शिंदेंनी एक विधान केलं होतं. “सरकारची नवी टर्म असली, तरी आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची अदलाबदल झालेली आहे, असं एकनाथ शिंदे (फडणवीसांकडे बोट दाखवत) म्हणाले. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादांचं बरं आहे,नो टेन्शन.” अशी टिप्पणी शिंदेनी केली होती. त्यावरून राऊतांनी शिंदेंना सुनावलं. ती ( मुख्यमंत्रीपदाची) खुर्ची बदलू नये, कायम रहावी यासाठीच शिंदे हे मध्यंतरी अमित शहांना भेटले होते. पण ती खुर्ची तात्पुरती असल्याचे शहांनी त्यांना सांगितलं होतं. आणि ती खुर्ची कायमस्वरूपी हवी असेल तर भाजपात विलीन व्हा, असेही अमित शहांनी शिंदेंना सांगितल्याचा दावाही राऊतांनी केला.