
हे काल फोटो समोर आले , ते मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचले नव्हते का ? काल रात्री मुख्यमंत्री गाडीत बसून उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेले आणि तिथे बैठक झाली. पण हेच मुख्यमंत्री स्वत: त्यांना बोलावून घेऊ शकत नाहीत का ?
मुख्यमंत्र्यांना आधी कळत नाही का ? असा सवाल विचारत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 82 दिवस उलटून गेल्यानंतर अखेर आज मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. त्यांच्या पीएने राजीनामा घेऊन सागर बंगला गाठला आणि तो मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. धनंजय मुंडे यांचा राजीनामा आपण स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं. मात्र या मुद्यावरून विरोधक अजूनही आक्रमक असून आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर हल्ला चढवला.
सरकार एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाही का ?
गेल्या काही महिन्यांत राजकारण एवढं घाणेरडं झालं आहे, कधी सरपंचांना सांगतात तुम्हाला फंड देणार नाही, तुम्हाला अधिकार देणार नाही असंही सांगतात. पण हेच सरकार एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाही का ? स्वत:च्याच कार्यकर्त्याला ते न्याय देऊ शकत नाहीत का ? असा प्रश्न विचारत, हे सरकार बरखास्तच केलं पाहिजे अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.
9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हाच विरोधकांनी ही अत्यंत क्रूर हत्या झाल्याचा आरोप केला होता. काल समाज माध्यमांवर सीआयडीच्या दोषारोपपत्रा सोबतचे फोटो समोर आले. त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. याआधी सुद्धा याच मुद्यावरुन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करण्यात आली होती. पण सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही. पण काल हे फोटो समोर आल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला.
काल रात्री देवगिरीवर झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचा आदेश दिला.त्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडे यांचा पीए हा त्यांचा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर पोहोचला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी तो राजीनामा स्वीकारल्याचे माध्यमांसमोर सांगितलं.
महायुतीतूनच कानपिचक्या
दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर आणि आता .या संपूर्ण राजीनामा नाट्यानंतर आज केवळ विरोधकांकडूनच नव्हे तर महायुतीतील नेत्यांकडूनही कानपिचक्या देण्यात आल्याचे दिसले. महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही या प्रकरणी एक ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “मस्साजोगचे सरपंच संतोषदेशमुख यांची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणात वाल्मिक कराड या क्रूरकर्माला आता फासावरच लटकवा अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली आहे.
एकेकाळी पाणक्या म्हणून काम करणाऱ्या वाल्मिक कराडने आणि त्याच्या साथीदारांनी बीडमध्ये गुंडगिरी चा उच्चांक गाठला आणि आपल्या दुष्कृत्यांमुळे हा माणूस आज सगळ्यांना डोईजड झाला आहे. सामान्य लोकांबरोबरच तिकडच्या ग्रामसेवक, सरपंच, नगरसेवक यांनाही त्याने देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. माणुसकीला काळीमा फासणारे असुरी कृत्य त्याने केले आहे. महाराष्ट्र सरकारने अशा वर्तमानकालीन क्रूरकर्मा औरंग्याला आणि त्याच्या साथीदारांना, फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवून फासावरच लटकवलं पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे. सामान्य माणसासाठी शिवसेना कायम कटिबद्ध आहे. या प्रकरणी आज शिवसेनेतर्फे आम्ही आंदोलन उभारणार असून आमचा निषेध सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत. असे नरेश म्हस्के यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.