
स्वारगेट बस स्थानकातील लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित तरुणीचा न्यायालयात जबाब नोंदवला गेला. इन कॅमेरा झालेला हा जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्यात आला आहे. तिच्या बाबतीत नेमका काय प्रकार झाला हे जबाबात सविस्तरपणे मांडण्यात आलं आहे.
या प्रकरणात आरोपी दत्तात्रेय गाडे याचा नुकताच पोलिसांनी जबाब नोंदवला असून त्याची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे. स्थानकाच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना 25 फेब्रुवारीला घडली होती. तरुणीवर अत्याचार करून पसार झालेल्या गाडे याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. गाडेला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो माध्यमात व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. यातील आरोपींना फाशी दिली जावी, अशी मागणी यादरम्यान करण्यात येतेय. आरोपपत्रात सरपंच देशमुख यांची हत्या नेमकी कशी झाली याचे फोटो समोर आले. त्यानंतर संतापाची लाट पसरली आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…