
कोण आहेत हे पुजारी जे जगन्नाथ पुरी येथे उभारतायत आलिशान रिसॉर्ट ?
ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे पुजारी दैतापती भवानी दास हे एक आलिशान आणि भव्य दिव्य रिसॉर्ट उभारत आहेत. पुरीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या या रिसॉर्टमध्ये एकूण ३०० रूम असतील.
हे रिसॉर्ट पूर्णपणे शाकाहारी असेल. २०० कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट २०२६ च्या रथयात्रेपूर्वी अर्थात १४ ते १६ महिन्यांत सर्वांसाठी खुला होण्याचा अंदाज आहे. महत्वाचे म्हणजे, भाविकांना आणि यात्रेकरूंना एका आध्यात्मिक शांततेची अनुभूती देणे, हा या रिसॉर्टचा उद्देश आहे.
यासंदर्भात बोलताना दैतापती भवानी म्हणाले, पुरी केवळ एक जागा नाही, तर एक पवित्र ठिकाण आहे. येथे समुद्रापासून दिव्यत्वाची अनुभूती होते. हे रिसॉर्ट आध्यात्मिक शांतता आणि आलिशान आदरातिथ्याचे एक कॉम्बिनेशन असे. ‘जगन्नाथम’ नावाच्या या प्रोजेक्टसाठी जवळपास 110 कोटी रुपयांचा खर्च लागण्याचा अंदाज आहे. या खर्चात जमिनीच्या किंमतीचा समावेश नाही.
आपण स्वतःच जमिनीचे मालक, जगन्नाथ मंदिराशी कुठलेही हितसंबंध नाहीत –
हे रिसॉर्ट पुरी-कोणार्क मरीन ड्राइव्हवर एकूण सात एकर एवढ्या समुद्र किनाऱ्यावर उभारले जात आहे. जे जगन्नाथ मंदिरापासून साधारणपणे 8 किमी अंतरावर असेल. महत्वाचे म्हणजे, आपणच जमिनीचे मालक आहोत. जगन्नाथ मंदिराशी कुठलेही हितसंबंध नाहीत, असेही दैतापती यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात, दास आणि त्यांचे कुटुंब या रिसॉर्टचे 100 टक्के मालक असेल. मात्र, प्रोजेक्टच्या मेंबरशिप प्रोग्रॅमला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार, इक्विटी कमी करण्यास तयार आहेत.
किती असेल सदस्यता शुल्क?…
या प्रोजेक्टसाठी, सदस्यत्व शुल्क ३.५ लाख, ५ लाख आणि ७ लाख रुपये, असे असेल. संबंधित सदस्यांना पाच वर्षांसाठी दरमहा तीन रात्री राहण्याची संधी मिळेल. पुरीमधील इतर आलिशान रिसॉर्ट्सच्या तुलनेत हा एक परवडणारा पर्याय आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ५,००० सदस्य बनवणे, हे रिसॉर्टचे उद्दिष्ट आहे.
रिसॉर्टमध्ये असती या खास सुविधा –
या रिसॉर्टमध्ये स्टुडिओ आणि डिलक्स कॉटेज, एक स्पा, एक अँफीथिएटर, एक जॉगिंग ट्रॅक, एक टेनिस कोर्ट आणि खास वेलनेस स्पेस असतील.