
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असणार स्वागताध्यक्ष, प्रथमच 9 राज्यातील वारकरी येणार…
वारकरी साहित्य परिषदेचे 13 वे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन शिर्डीमध्ये होणार आहे. हे वारकरी संमेलन येत्या 22 आणि 23 मार्च रोजी होणार आहे.
या संमेलनासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. संजय महाराज देहूकर हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत. तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वागताध्यक्ष असणार असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यंदा प्रथमच 9 राज्यातील वारकरी सांप्रदायिक प्रतिनिधी या संमेलनासाठी उपस्थित राहणार असल्याचेही विठ्ठल पाटील यांनी सांगितले. संत साहित्याचा आणि मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे संमेलन गेल्या 12 वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे.
समाजाला योग्य दिशा देण्यासाठी हे संमेलन एक महत्त्वाचे व्यासपीठ
11 नोव्हेंबर 2011 रोजी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना झाली. या संस्थेमार्फत अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन केलं जातंय. महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांच्या विचारांचा प्रसार करणं आणि समाजाला योग्य दिशा देणं हा, या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. या संमेलनात वारकरी संप्रदाय, महानुभव पंथ, नाथ संप्रदाय, रामदासी संप्रदाय यांसारख्या विविध क्षेत्रांतील मराठी संतांच्या साहित्यावर चर्चासत्रे आणि विचारमंथन होईल. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी हे संमेलन एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास अखिल भारतीय मराठी संत साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी व्यक्त केलाय.
शिर्डी शहरातून पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढण्यात येणार
शिर्डीत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी 22 मार्च रोजी संपूर्ण शिर्डी शहरातून पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढण्यात येणार आहे. दिंडी कार्यक्रमास्थळी दाखल झाल्यानंतर परिषेदेला सुरूवात होणार आहे. तसंच या अखिल भारतीय मराठी संत साहित्य परिषेदेला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, आमदार , खासदार उपस्थिती राहणार असल्याचंही विठ्ठल पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, दरवर्षी राज्याच्या विविध भागात हे संत साहित्य वारकरी संमेलन भरवलं जाते.