
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
आम्ही जातों आपुल्या गावा।आमुचा रामराम घ्यावा।।१।।तुमची आमची हे चि भेटी। येथुनियां जन्मतूटी ।। धृ।।आतां असो द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ।।२।। येता निजधामीं कोणी । विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ।।३।।रामकृष्ण मुखी बोला । तुका जातो वैकुंठाला ।।४।।
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ वा वैकुंठगमन सोहळा ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात टाळ मृदुंगाचा गजरात वैष्णवांच्या उपस्थित नांदूरकीच्या वृक्षावर फुलांचा वर्षाव करीत देहूनगरीत दाखल झालेल्या लाखो वैष्णवांच्या मेळ्याने याचि देही ,याचि डोळा अनुभवला.दुपारी बरोबर १२ वाजता पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम चा गजर करीत नांदूरकीच्या वृक्षावर पानफुल ,तुळशी पत्रांचा वर्षाव करून या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळा रविवार ( ता.१६ ) रोजी अनुभवला.यावेळी संपूर्ण देहूनगरी लाखो वारकरी भाविक भक्तांच्या उवस्थितीने फुलून गेली होती.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळा अनुभवण्यासाठी रविवार रोजी लाखो वारकरी भाविक भक्त तसेच अनेक दिंड्या ,दिंडीकरी ,फडकरी दिंडी चालक मालक ,*धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ।।धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे ।उच्चरीती याचे नाम घोष ।।या संत तुकोबांच्या अभंग उक्ती प्रमाणे अर्थात हजारो लाखो वैष्णवांचा मेळा या पवित्र आशा श्रीक्षेत्र देहूनगरीत दाखल झाला होता.
धार्मिक कार्यक्रम
देहू देवस्थान संस्थान च्या वतीने ,जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्या निमित्त मुख्य मंदिरात पहाटे ३ वाजता काकडा आरती करण्यात आली.पहाटे ४ वाजता संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष विश्ववस्त / वारकरी यांच्या हस्ते श्रींची महापूजा , शिळा मंदिर या ठिकाणी महापूजा करण्यात आली.
सकाळी साडे दहा वाजता आकर्षक आशा पाना फुलांनी सजवलेल्या पालखीत संत तुकोबांच्या पादुका ठेवण्यात आल्या.त्यानंतर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ,श्री ज्ञानदेव तुकाराम च्या गजरात हजारो वारकरी भाविक भक्तांच्यासह पालखी मुख्य मंदिरातून बाहेर आली.या पालखी चे संत तुकाराम महाराज वैकुंठस्थान मंदिर या ठिकाणी आगमन झाले.
वैकुंठस्थान मंदिर येथे वैकुंठगमन सोहळा कीर्तन
या ठिकाणी संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्या निमित्त , संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर महाराज यांचे
घोंठवीन लाळ ब्रम्हज्ञा हाती । मक्ता उपस्थिती सांडवीन । भ्रमभूत काया होतसे कीर्तनीं । भाग्य तरी ऋणी देव ऐसा। तीर्थभ्रामकासी आणीन आळस । कडू स्वर्गवास करीन भोग।सांडवीन तपोनिधी अभिमान । यज्ञ आणि दान लाजवीन । भक्तिभाग्यसीमा साधीन पुरुषार्थ । ब्रम्हीचा तो अर्थ निजठेवा। धन्य म्हणवीन येह लोकीं लोकां । भाग्य आम्ही तुका देखियेला ।
या अभंगावर कीर्तनसेवा झाली.त्यानंतर बरोबर बारा वाजता संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठक्षणी लाखो वैष्णवांनी आपल्या हातातील तुळशी पत्र आणि पानाफुलांचा नांदूरकीच्या वृक्षावर वर्षाव करून हा वैकुंठगमन सोहळा अनुभवला.त्यानंतर देहू देवस्थान चे विश्ववस्त / शासकीय अधिकारी ,यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज वैकुंठस्थान मंदिरात आरती करण्यात आली.आरती झाल्या नंतर संत तुकाराम महाराजांची पालखीचे मुख्य मंदिराकडे प्रस्थान झाले.दुपारी दोन वाजता पालखी पुन्हा मुख्य मंदिरात येऊन विसावली.त्या ठिकाणी देहू देवस्थानचे अध्यक्ष ,विश्ववस्त यांच्या हस्ते , मानाचे दिंडीकरी वारकरी यांचा श्रीफळ व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.आशा प्रकारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३७५ वा वैकुंठगमन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
अवघी देहूनगरी भक्तीरसात न्हाली
जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३७५ व्या वैकुंठगमन सोहळा अनुभवण्यासाठी देहूत इंद्रायणी तरी ,मोकळी मैदाने , सोसायट्या ,विविध मंदिरा मध्ये बीज सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दररोज ,हरीपाठ , पारायण , भजन कीर्तन असे कार्यक्रम होत होते.त्यामुळे संपूर्ण देहूनगरी भक्तरसात न्हाऊन निघाली होती.तर टाळ मृदुंग व हरिनामाच्या गजराने अवघी देहूनगरी दुमदुमून गेली होती.आशा मोठ्या भक्तिमय वातावरणात ,हजारो ,लाखो वैष्णव मेळ्याच्या उपस्थित संत तुकाराम महाराज ३७५ वा वैकुंठगमन सोहळा पार पडला.