
शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांची वर्णी तर राष्ट्रवादीची लॉटरी कुणाला ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक येत्या 27 मार्चला होणार आहे.
अशातच आज (सोमवार 17 मार्च) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या वाट्याला एक जागा आली आहे. दरम्यान या एका जागेसाठी अनेकजण इच्छूक असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पेचात सापडल असल्याची ही चर्चा होती. मात्र या रिक्त जागांच्या निवडणुकीसाठी आता भाजप पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेही आपल्या उमेदवाराचे नावे जाहीर केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला विधानपरिषदेची एक जागा मिळाली होती. मात्र या जागेसाठी अनेक इच्छुक नावे पुढे आली होती. मात्र या अनेक नावात आघाडीवर असलेल्या धुळे -नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी, पण एकनाथ शिंदेंनी मोहरा निवडला
धुळे – नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव सुरुवातीपासून आघाडीवर होतं. तर शिवसेनेकडून माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचे नाव देखील चर्चेत असून त्यांनी सातत्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर आक्रमकपणे टीका करणारं नेतृत्व ही शीतल म्हात्रे यांची सध्याची ठळक ओळख होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांचं नाव चर्चेत होतं. संजय मोरे हे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. संजय मोरे हे ठाण्याचे माजी महापौर आहेत. तर दुसरीकडे नागपूरच्या किरण पांडव यांच्या नावाचीसुद्धा चर्चा सुरू होती. किरण पांडव हे विदर्भातील एकनाथ शिंदे यांचे मजबूत शिलेदार आहेत. मात्र या साऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपला मोहरा निवडला असून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.