
औरंगजेबाची कबर हटवण्यावर ठाकरे गटाची भूमिका काय ?
औरंजेबाची कबर काढून टाकावी, अशी मागणी बजरंगदल आणि विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. तसंच, सरकारने कबर न हटवल्यास कारसेवा करू, असा इशाराही बजरंग दलाकडून देण्यात आला आहे.
यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत.
यासंदर्भात आता शिवसेनेच्या ठाकरे गटानेही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ठाकरे गटाने त्यांचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून यासंदर्भात भाष्य केलं आहे. औरंगजेब आणि अफझलखानाची थडगी महाराष्ट्रातच आहेत. त्याकडं शौर्याची स्मारकं म्हणून बघायला हवं असं ते म्हणाले. तसंच, महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांचे थडगे याच मातीत कसे बांधले जातात? हा इतिहास काही लोकांना पुसून टाकायचा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलं ?
काही नवहिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे की, ज्याप्रमाणे बाबरी पाडली त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू. हे लोक इतिहासाचे व महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचे शत्रू आहेत. त्यांना महाराष्ट्राचे वातावरण विषारी करायचं आहे व स्वतःला हिंदू-तालिबानी म्हणून मिरवायचं आहे. हिंदुत्वाचे विकृतीकरण घडवून शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचाही ते अपमान करीत आहेत, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
शिवाजी महाराज कोणाविरुद्ध लढले? मराठ्यांनी २५ वर्षे दुश्मनांना कसं झुंजवलं? महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांचे थडगे याच मातीत कसे बांधले जाते? हा इतिहास काही लोकांना पुसून टाकायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चाललेले हे दळभद्री उद्योग मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंद पाडायला हवेत”, अशी मागणीही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. औरंगजेब आणि अफझलखानाची थडगी महाराष्ट्रातच आहेत. शौर्याची स्मारके म्हणून त्याकडे पाहायला हवे, असं ही ठाकरे गटाने म्हटलं आहे.