
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी -सुधीर घाटाळ
डहाणू-जव्हार मुख्यरस्त्यावर गंजाड येथे सुरू असलेल्या RKC कंपनीच्या कामामुळे पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून अपघातांची शक्यता वाढली आहे.सदर पर्यायी रस्ता खडी टाकून बनवण्यात आला आहे, त्यामुळे दुचाकी आणि रिक्षा चालवताना वाहनचालक गोंधळून जात आहेत. केवळ चार दिवसांतच हा रस्ता खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, एक्सप्रेस वेचे काम सुरू असताना हा पर्यायी रस्ता व्यवस्थित बनवला गेला पाहिजे, अन्यथा मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठेकेदार किंवा कंपनीने तातडीने या रस्त्याची सुधारणा करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.जर या समस्येकडे दुर्लक्ष केले गेले, तर आम्ही वाहनचालक संघटित मोर्चा काढू, असा इशारा संतप्त वाहनचालकांनी दिला आहे. प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराने याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.
“हे काम अत्यंत खराब झाले आहे. मी संबंधित RKC कंपनीच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली असून, लवकरच हा रस्ता व्यवस्थित बनवून घेतला जाईल. या समस्येसाठी माझा स्पष्ट विरोध आहे. तोपर्यंत मी सातत्याने प्रयत्न करत राहीन.”
कौशल कामडी- गंजाड प्रभारी सरपंच
“आम्ही रिक्षा चालक चारोटी बाजूने प्रवासी घेऊन जात असताना रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे अपघात होण्याची भीती वाटते. प्रशासनाने हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू.”
प्रविण वरठा ( रिक्षा चालक अध्यक्ष गंजाड )