
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
अन्न, वस्त्र निवारा या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा..! एकवेळ अन्न नाही मिळालं तरी माणूस जगू शकेल. मात्र पाण्याविना माणसाचा जीव कासावीस होतो. त्यामुळे पाणी हा घटक देखील मानवी जीवनात मूलभूत गरजेपेक्षा अतिमहत्त्वाचा घटक आहे. वर्णव्यवस्थेची वाळवी लागलेल्या या देशातील समाजरचनेत पाण्यासारख्या महत्त्वाच्या घटकात देखील कर्मठ जातीवाद्यांनी स्पृश्य अस्पृश्यतेची घाण सोडून निर्मळ पाण्याला सुद्धा जातीयतेने मलीन करून आपली मक्तेदारी अबाधित ठेवली होती. तेव्हा जातीयतेच्या अनिष्ट रुढीपरंपरेतून मूलभूत गरज असलेल्या पाण्याला सर्वसामान्य शोषित, वंचित गोरगरीबानांही पाणी पिता यावे. त्यांना त्यांचा मूलभूत समानतेचा, हक्क अधिकार मिळावा याकरिता या देशात पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला आहे. तो त्रिलोकनिय निनादलेला संघर्ष म्हणजे महाड येथील चवदार तळ्यावरील संघर्ष..! जो भारतीय इतिहासात महाड क्रांती दिन म्हणून प्रचलित आहे. खैबरखिंडीतून आलेल्या आर्यांनी या देशातील मूलनिवासी भारतीय लोकांना चातुर्वणात विभागून आपल्या सत्तेचे बस्तान मांडले. आणि या वर्णव्यवस्थेत अत्यंत नीच गणल्या गेलेल्या शुद्राला अत्याचाराचे पाईक केले. हिंदू आर्यांनी शूद्रांवर अत्याचार करतांना सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. पूर्वीपासून चालत आलेली ही अत्याचाराची, स्पृश्य अस्पृश्यतेची श्रृंखला एकोणिसाव्या शतकात देखील सुरूच होती. अत्याचाराचा, स्पृश्य अस्पृश्यतेचाच एक भाग म्हणून शूद्रांना सार्वजनिक ठिकाणांहून पाणी पिण्यास सक्त मनाई होती. एकोणिसाव्या शतकात सुद्धा सार्वजनिक विहिरी, तलाव या ठिकाणी येण्यास त्यांना मज्जाव केला जात होता. बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये श्री. सी के बोले यांनी १९२३ मध्ये सार्वजनिक निधीमधून बांधण्यात आलेले तसेच शासकीय अखत्यारीत येणाऱ्या संस्थाकडून संचालित असलेली सार्वजनिक शाळा, न्यायालये, दवाखाने, धर्मशाळा आणि सार्वजनिक पाण्याची ठिकाणे विहिरी, जलसाठे या सर्व ठिकाणांचा वापर करण्यास अस्पृश्य वर्गाला देखील परवानगी देण्यात यावी. असा प्रस्ताव १९२४ मध्ये बहुमताने पारित करून तो अधिनियमीत करून नगरपालिकेच्या माध्यमातून अंमलात आणला. हा ठराव पास होताच महाड नगरपालिकेने त्यांच्या अखत्यारीत असलेले चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी खुले केले. मात्र हा अधिनियम अंमलात आणल्यावर सुद्धा हिंदूनी या देशातील शूद्रांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यास बंदी घातली. या कर्मठ सनातन्यांनी येथील शोषित, पीडित मूलनिवासी समाजाला पाण्याच्या एका-एका थेंबापासून वंचित ठेवले. परिणामी लोकांचा तहानेने व्याकुळ होऊन तडफडून मृत्यू व्हायचा. पण त्यांच्या तोंडात पाणी काही पडायचे नाही. ज्या सार्वजनिक तलावात कुत्रे, मांजरी, बकऱ्या पाणी प्यायचे तिथे मात्र माणसांना पाणी पिण्यास सक्त मनाई होती. कारण काय तर जातीने अस्पृश्य आहे म्हणून…! जनावरांनी पाणी पिले, ती तलावात डांब – डांब डुंबलेत तेव्हा तलावाचा विटाळ व्हायचा नाही मात्र शुद्राने जर का पाणी स्पर्शिले तर समद तलाव त्याने बाटविला अशी बोंब ठोकून त्यांना कठोर शिक्षा केली जात असे. माणसा माणसातील भेद आज पाण्यातही दुफळी निर्माण करत आहे. आणि त्यामुळे शोषित, पीडित समाज पाण्यापासून वंचित राहून वेळप्रसंगी मृत्यू पावत आहे. ही बातमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कानी पडल्यावर त्यांनी पाणी पिण्याचा मूलभूत समतेचा हक्क या शोषित, पिढीत समाजाला मिळवून देणारच..! या एकाच उद्देशाने त्यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्यावर सुमारे चार हजार अनुयायांसह ओंजळ भर पाणी पिऊन आपला सामाजिक समतेचा अधिकार बजावून प्रस्थापित ब्राम्हणवादाला हादरा दिला. हा ऐतिहासिक दिवस भारतीय सामाजिक आंदोलनामध्ये महाड क्रांती दिवस म्हणून प्रचलित झालेला आहे. हे आंदोलन म्हणजे प्रस्थापित ब्राम्हणशाही विरोधात पुकारलेले रोकठोक बंडच होते. १९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी महाड नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती, ठिकाणे सार्वजनिकरित्या अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सभा घेण्यासाठी बोलाविले होते. या सत्याग्रहात अनंत विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुध्दे व इतर पुरोगामी विचारांचे सामाजिक कार्यकर्ते सहभागी होते. या ऐतिहासिक सत्याग्रहामध्ये हजारोच्या संख्येने लोकं जमा झाली होती. आयोजित सभेमध्ये डॉ. आंबेडकरांनी वर्षानुवर्षांपासून चालत आलेल्या सामाजिक, धार्मिक गुलामगिरी विरोधात आपल्या भाषणात तीन प्रमुख गोष्टींवर प्रहार करून लोकांना प्रभावितपणे संबोधित केलं कि, तुम्ही आता हा घाणेरडा व्यवसाय त्यागला पाहिजे ज्यामुळे तुमच्यावर अस्पृश्यता लादली गेली आहे. दुसरं म्हणजे तुम्ही मृत जनावरांचे मास खाण्याची परंपरा आता सोडून दिली पाहिजे आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अस्पृश्य आहात या नीच मानसिक भावनेतेतून मुक्त व्हा. सभा झाल्यानंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेलेत. सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ओंजळभर पाणी पिले. त्यानंतर सर्व लोकांनी पाणी पिले. आता या पाण्यावर कुण्या एका जातीचे वर्चस्व राहिले नसून हे जलाशय सर्व जातींसाठी तसेच मुस्लिम, इसाई, सिख व अन्य धर्मासाठी सुद्धा खुले करण्यात आले हे बाबासाहेबांचा हस्त स्पर्शाने सिद्ध केले होते. या सत्याग्रहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या सत्याग्रहात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. सभेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी उपस्थित स्त्रियांना आव्हान केले होते. त्याकाळी स्त्रिया गुडघ्यापर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत. आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जातीय स्त्रियांसारखे पूर्ण टाच घोळ लुगडे नेसण्याचे सुचविले आणि परिणामी काही दिवसातच स्त्रियांच्या पहेरावात सुधारणा दिसून आली होती. त्याचप्रमाणे पुरुषांनाही आता कायम हातात काठी ठेवायची गरज नाही असे आव्हान त्यांनी पुरुष वर्गाला देखील केले होते. महाड नगर पालिकेने सरकारी अखत्यारीतील सर्व पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचा जरी निर्णय घेतला होता. तरी मात्र सार्वजनिक पाणवठ्यांवर, विहिरींवर तसा कसलाही उल्लेख केला गेलेला नव्हता. त्यामुळे मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पाणवठ्यावर पाणी पिण्याची हिंमत केली नाही. त्यामुळे सभेसाठी आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी ४० रुपये किमतीचे पाणी उच्च जातीय हिंदूंकडून त्याकाळी विकत घेण्यात आले होते. कारण सभेच्या ठिकाणी अस्पृश्यांना आसपासच्या पाणवठ्यावरून पाणी घेण्यास सक्त मनाई होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे पाणी पिल्यावर ते सरकारी बंगल्यावर आराम करायला गेलेत. सुमारे दोन तासांच्या आताच चवदार तळ्याचे पाणी बाठवल्यावर आता हे अस्पृश्य लोक विरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिर बाठवणार आहेत. आपला धर्म धोक्यात आहे. अशी अफवा उच्च जातीच्या लोकांनी समाजात पसरवून सभेच्या ठिकाणी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असलेल्या अस्पृश्य लोकांवर लाठ्या काठ्यांनी, हत्यारे घेऊन हल्ला केला. यात बरीच लोकं जखमी झालीत. त्यानंतर हा उच्च जातीय हिंदूचा घोळका महाड परिसरात फिरून अस्पृश्य लोकांना धमकावित होता. एवढंच काय तर..? शेजारील सर्व गावांमध्ये या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचवला गेला. त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले. या सत्याग्रहाला गांधीजींनी पाठिंबा दिला होता. हिंदू स्पृश्यांनी अस्पृश्यांवर अशाप्रकारे हिंसा करुन चुक केली आहे असे मत त्यांच्या यंग इंडियामध्ये प्रकाशित केले होते. अहिंसा हे तत्त्व मानणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिदूंविरूद्ध “हिंसा करू नका” असा आदेश दिला होता. त्यामुळे एवढी हिंसा होऊन सुद्धा आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा संख्येने जास्त असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला हे इथे विशेषतः सांगावेसे वाटते. मात्र दलितांच्या या ऐतिहासिक विद्रोहाविरूद्ध तत्कालीन काही प्रसार माध्यमांचा जातीवादी रोष स्पष्ट दिसून येत होता. सनातनी हिंदूची मक्तेदारी असलेल्या भाला वृत्तपत्रात २८ मार्चला दलितांना उद्देशून प्रकाशित करण्यात आले होते कि, तुम्ही लोकं मंदिर आणि तलाव यांना स्पर्श करणे बंद करा जर का असे करण्यात आले नाही तर आम्ही तुम्हाला धडा शिकवण्यासाठी सज्ज आहोत. या हिंसात्मक घटनेनंतर दुसऱ्या दिवशी महाडमधील सुवर्णांनी अस्पृश्य लोकांकडून अपवित्र झालेल्या चवदार तळ्याचे गोमुत्राने शुध्दीकरण केले. नंतर काही दिवसात महाड नगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणे खुली करण्याचा प्रस्ताव मागे घेतला. दुसरीकडे सुवर्ण लोक न्यायालयात गेलेत आणि चवदार तलाव हे चौधरी तलाव असून ते सार्वजनिक तलाव नाही अशी याचिका टाकली पर्यायाने पुन्हा एकदा चवदार तळे हे अस्पृश्य लोकांसाठी बंद करण्यात आले. मात्र हा समतेचा मूलभूत हक्काचा संघर्ष इथेच थांबला नाही आणि थांबून थकणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील नव्हते. पुढे हा मानवाधिकाराचा सत्याग्रह त्यांनी यथोचित सुरू ठेवला. आजच्या आधुनिक भारतात देखील हा संघर्ष सुरूच आहे. उत्तरप्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यात मंदिरात पाणी पिण्यासाठी गेलेल्या मुस्लिम समाजातील लहान मुलाला बेदम मारण्यात आले. अमानुषरित्या मारण्याचे मुख्य कारण म्हणजे पाणी पिणे नाही तर धर्म होय. आजही पाण्यावरून भेद नाही तर जाती, धर्मावरून भदाभेद सुरू आहे. पाणी हे विषमतेची विभागणी करणारे माध्यम येथील ब्राम्हणी व्यवस्थेने तेव्हापासून ते आजपर्यंत बनवून ठेवले आहे. हे या घटनेवरून सिद्ध होते. आजही हा समतेचा, मानवाधिकाराचा लढा लढण्यास येथील शोषित पीडित वंचित समाज कटिबध्द आहे. आजचा दिवस हा आपले अधिकार सुनिश्चित करण्याचा सुवर्ण दिवस..! आपले सामाजिक सशक्तीकरण कसे करता येईल याचे आत्मचिंतन करण्याचा हा स्मरणार्थ दिवस आहे. संवैधानिक अलौकिक मानवी अस्मितेचा, मानवाधिकाराच्या या अजरामर संघर्षमय प्रेरक दिनाच्या सर्व समतावादी नागरिकांना हार्दिक शुभेच्छा…!!!
अखिल खैरे, नागपूर
7769874400