
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी- अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : “मेरी लास्कर या काही डॉक्टर, संशोधिका किंवा राजकीय व्यक्ती नसल्या तरी आरोग्याच्या समस्यांमुळे अस्वस्थ होत्या. त्या सतत कार्यरत राहिल्या, निधी गोळा करत राहिल्या, आणि गरज भासल्यास राजकीय नेत्यांनाही जाब विचारला. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान असामान्य होते,” असे मत आयटी तज्ज्ञ व साहित्यिक मा. डॅनिअल मस्करणीस यांनी व्यक्त केले.
*मेरी लास्कर यांच्या जीवनचरित्रावर वाचक संवाद*
‘चला कवितेच्या बनात’ या उपक्रमांतर्गत उदगीर येथे मेरी लास्कर यांच्या जीवनकार्यावर आधारित वाचक संवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संवाद साधताना मा. डॅनिअल मस्करणीस यांनी मेरी लास्कर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. हा कार्यक्रम वाचक संवादाच्या ३३३ व्या पुष्पाच्या निमित्ताने संपन्न झाला.
लोकमत टाइम्सचे पत्रकार डॉ. धनाजी कुमठेकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मेरी लास्कर यांच्या योगदानाविषयी माहिती देताना मस्करणीस म्हणाले, “लास्कर फाउंडेशनच्या माध्यमातून मेरी लास्कर यांनी आरोग्य सेवेसाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अमेरिकेत २७ उपसंस्था स्थापन झाल्या. याचा फायदा केवळ अमेरिकेतील नागरिकांनाच नाही, तर जगभरातील लोकांना झाला.”
*संशोधनासाठी पाठबळाची गरज*
आज जगभरात अनेक संस्था आरोग्यासाठी कार्यरत आहेत, मात्र निधी आणि राजकीय पाठबळ नसल्याने संशोधनास मर्यादा येतात. अशा परिस्थितीत मेरी लास्कर यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे, असेही मस्करणीस यांनी स्पष्ट केले.
*श्रोतृवर्गाचा उत्स्फूर्त सहभाग*
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित श्रोत्यांनी अनेक प्रश्न विचारले. संवादकांनी अतिशय वस्तुनिष्ठ आणि समाधानकारक उत्तरे देत श्रोत्यांना अंतर्मुख केले. मेरी लास्कर यांच्या कार्यपद्धतीवर आधारित चर्चेत विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग होता.
या वाचक संवाद कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्य संयोजक अनंत कदम, आनंद बिरादार, तुळशीदास बिरादार, डॉ. कांत जाधव, मुरलीधर जाधव, प्रा. राजपाल पाटील, सुरेश वजनम आदींनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमास उद्योजक रमेश अंबरखाने, डॉ. संग्राम पटवारी यांच्यासह अनेक मान्यवर, विद्यार्थी, पत्रकार आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचा परिचय डॉ. म. ई. तंगावार यांनी केला, तर आभार प्राचार्य डॉ. शिवाजी सगर यांनी मानले.
या कार्यक्रमामुळे मेरी लास्कर यांचे कार्य आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती वाचकांपर्यंत पोहोचली.