
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-प्रेम सावंत
परभणी:जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत २४ मार्च २०२५ रोजी पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याला 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. अभियंता अण्णासाहेब किसनराव तोडे (वय 56) यांनी अंगणवाडी कंपाऊंड वॉल आणि नाली बांधकामाच्या मोजमाप पुस्तिकेवर (MB) सही करण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणी येथे 4 मार्च रोजी तक्रार दिल्यानंतर प्राथमिक पडताळणी करण्यात आली. 18 मार्च रोजी आरोपी अभियंत्याने तक्रारदाराला एमबी लिहून दिले व बांधकामाच्या रकमेचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर 10,000 रुपये लाच म्हणून आणून द्यावे लागतील, असे सांगितले. यानंतर 24 मार्च रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि आरोपी अण्णासाहेब तोडे यांनी पंचासमक्ष 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली.
लाच स्वीकारल्यानंतर आरोपीच्या अंगझडतीत 10,000 रुपये लाच रक्कम, 1,330 रुपये रोख आणि मोबाईल फोन मिळाला. त्यानंतर त्याच्या यशोधन नगर, परभणी येथील घराची झडती घेतली असता 58,500 रुपये रोख आणि 80 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. संपूर्ण कारवाई दरम्यान व्हिडिओ शूटिंगद्वारे पुरावे संकलित करण्यात आले.
शेवटचे वृत्त हाती आले या प्रसंगी परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, आरोपीचा मोबाईल तपासासाठी जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.