दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड:तालुक्यातील धारासुर येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या श्री गुप्तेश्वर मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी स्मारकस्तरीय महावारसा समितीची महत्त्वपूर्ण बैठक दि. 20 मार्च 2025 रोजी पार पडली. या बैठकीचे अध्यक्षपद गंगाखेड तहसीलदार सौ.उषा किरण शृंगारे मॅडम यांनी भूषवले.
गुप्तेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार व संवर्धन कार्य पुरातत्व विभाग, नांदेड अंतर्गत सवानी व्हेरिटेज कंझर्वेशन कंपनी, मुंबई यांच्या मार्फत सुरू असून, कामाच्या अनुषंगाने मंदिराच्या परिसरातील भूसंपादन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीदरम्यान तहसीलदार मॅडम यांनी मंदिराला भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
मंदिर परिसरातील काही जागा खासगी मालकीची असल्यामुळे भूसंपादन प्रक्रिया रखडली होती. ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या संदर्भात आवश्यक असलेल्या संमती पत्रांचे संकलन, भूमापन आणि प्रस्ताव पाठवण्याचे आदेश देण्यात आले. मंदिराच्या मजबुतीकरणासाठी पुरातत्व शास्त्रानुसार तीन ते चार फूट उंचीवरील गोल गोटे हटवून काळी माती काढण्याचा आणि पाया मजबुतीकरणासाठी चुना आणि पांढरी माती मिश्रणाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्मारकस्तरीय महावारसा समितीच्या बैठकीत भूसंपादन प्रक्रिया: जागा मालकांची संमती घेऊन मोजणी करून त्वरित प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश,संवर्धन कार्य: मंदिराच्या मजबुतीकरणासाठी योग्य पद्धतीने बांधकाम करण्याच्या सूचना,बाह्य वळण रस्ता: मंदिराभोवती वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याच्या संदर्भात संबंधित विभागाशी पत्रव्यवहार, संपूर्ण प्रकल्पाची मुदत: डिसेंबर 2027 पर्यंत काम पूर्ण करण्याचा निर्धार, नियमित देखरेख: दर आठवड्याला मंदिराच्या कामाची पाहणी करण्याचा निर्णय यासह अन्य निर्णय घेण्यात आले.
तहसीलदार सौ.उषा किरण शृंगारे यांनी गुप्तेश्वर मंदिराच्या दौऱ्यादरम्यान मंदिरातील नक्षीकाम आणि मूर्तींचे सौंदर्य पाहून आनंद व्यक्त केला. “धारासुर येथील समृद्ध आणि वैभवशाली वारसा जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या बैठकीस पुरातत्व विभाग, नांदेडचे सहायक संचालक अमोल गोटे, पुरातत्त्व सहाय्यक सचिव रुक्मिण रोडगे, कामाजी डक, गंगाखेड नायब तहसीलदार सुनील कांबळे, सरपंच राजाभाऊ गवळे, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी, महावारसा समिती सदस्य, गुप्तेश्वर मंदिर बचाव संघर्ष समितीचे निवृत्ती कदम आदी मान्यवर उपस्थित होते.