
मेलेल्या पिराजी भिसेंना ‘जिवंत’ करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली…
राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर साताऱ्यातील एका महिलेने छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. 2016 चे हे प्रकरण असून जयकुमार गोरे यांनी स्वत:चे नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप महिलेने केला होता.
यामुळे जयकुमार गोरे हे चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटीची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी काही दिवसांपासून अटक केली. यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मेलेल्या पिराजी भिसेंना ‘जिवंत’ करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
रोहित पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून जयकुमार गोरेंविरोधात हक्कभंग यावा, यासाठी मी अध्यक्षांना भेटलो आहे. मुख्यमंत्र्यांकडे बसून ते दबाव आणत आहेत. जयकुमार गोरेंची प्रकरणं मला तेथील लोकांनी पाठवली आहेत. त्यांच्या कॉलेजला जायला रस्ता मिळावा, यासाठी मातंग समाजातील एक व्यक्ती वारली होतो, त्यांना जिवंत केलं आणि जमीन स्वत:च्या नावाने करुन घेतली. पिराजी भिसे असे त्या व्यक्तीचे नाव होते, असा आरोप जयकुमार गोरे यांच्यावर केलाय.
मेलेल्या पिराजी भिसेंना ‘जिवंत’ करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
रोहित पवार पुढे म्हणाले की, करारनामा 11 डिसेंबर 2020 रोजी केला आहे. 8 ऑक्टोबर 2016 रोजी ते मृत झाले होते. त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र देखील आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. यात अनेक वेगळ्या गोष्टी जाणवतात. संजय काटकर यांचा फोटो लावला आणि भिसे आहे, असं दाखवण्यात आलं. भिसे अशिक्षित होते, मात्र त्यांची सही इंग्रजीमध्ये करण्यात आली. भिसे कुटुंबीयांना आता न्याय मिळत नाही. एका दिवसात निकाल खालच्या कोर्टात दिला गेला. मात्र, हायकोर्टात गेल्यानंतर न्यायाधीशांनी खालच्या कोर्टाच्या त्या न्यायाधीशांचे डिमोशन केले.
त्यांनी कॉलेजवर देखील कब्जा केला आहे. मविआच्या काळात सामान्य लोकांना मदत व्हावी, यासाठी कोरोना काळात योजना आणल्या होत्या. पहिल्या कोरोनाच्या लाटेत भिसे मरण पावले, त्यांना दुसऱ्या लाटेत जिवंत करण्यात आले, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आता रोहित पवारांच्या आरोपानंतर जयकुमार गोरे नेमकं काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.