
‘सौगात-ए-मोदी’वरून ठाकरेंच्या शिवसेनेचा राणेंवर हल्लाबोल !
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी काल विधान परिषदेत बोलताना मंत्री नितेश राणे यांचं नाव न घेता त्यांचा नेपाळी असा उल्लेख केला होता.महाराष्ट्रात एक नेपाळी आहे, त्याला वाटतंय की मीच हिंदू धर्म वाचवू शकतो, असं म्हणत त्यांनी राणेंवर निशाणा साधला होता.
आता याच शब्दाचा आधार घेत ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी नितेश राणेंसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्षाने रमझान ईदचे निमित्त साधत देशातील गरीब मुस्लिमांना ईदनिमित्त ‘सौगात-ए-मोदी’ हे किट देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार आता देशातील 32 लाख मुस्लिमांना हे किट देण्यात येणार आहे.
याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी मागील काही दिवसांपासून मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे.मोदी की सौगात जाहीर झाल्यावर मोदींनी महाराष्ट्रात पाळलेले जे नेपाळी आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला हवी. त्यांनी मोदी की सौगातच स्वागत केलय का ? असं म्हणत त्यांनी राणेंना डिवचलं.
माध्यमांशी बोलताना ‘सौगात-ए-मोदी’वर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात आनंदाचा शिधा आहे, तसा हा मोदींचा शिधा वाटणार आहेत. माझी प्रतिक्रिया असण्याचं कारण नाही. मोदींनी ही सौगात जाहीर झाल्यावर मोदींनी महाराष्ट्रात पाळलेले नकली हिंदुत्ववादी आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला हवी.
ज्यांचा उल्लेख आमच्या अनिल परबांनी काल नेपाळी असा केला, असे बरेच लोक महाराष्ट्रात आहेत. ज्यांना या देशात मुस्लिमांच अस्तित्वच मान्यच नाही, मुस्लिमांनी राहूच नये किंवा मुस्लिम शत्रूच आहेत, अशा प्रकारची भूमिका घेऊन अलीकडे जे लोक या देशातलं वातावरण खराब करत आहेत. त्यांनी मोदी की सौगातच स्वागत केलय का ?
आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो. कारण या देशातील गरीब मुस्लिमांना मोदींनी हात पुढे केला आहे. ही सरकारी मदत आहे. आम्ही त्यावर टीका करणार नाही. पण कालपर्यंत जे ईद, इफ्तारवर टीका करत होते त्यांची प्रतिक्रिया आली आहे का? बाडग्या हिंदुंची या निर्णयामुळे फारच गोची झाली आहे. कदाचित मोदी आता त्यांना इफ्तार पार्टीत सुद्धा पाठवतील, अशा शब्दात राऊतांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला.