
अजितदादा विश्वजीत कदम अन् अमित देशमुखांचा पत्ता ओपन करता करता राहिले…
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या पदासाठी महायुतीकडून फक्त अण्णा बनसोडेंचा अर्ज आला होता.
शिवाय अर्ज पडताळणीत त्यांचा अर्ज वैध ठरल्यामुळे त्यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागली.
बनसोडे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं. तसंच यावेळी अजितदादांनी 2019 ला अण्णा बनसोडे यांना पक्षाने तिकीट नाकारलं होतं तरीही आपण त्यांना गुपचूप रात्री 2 वाजता एबी फॉर्म दिल्याचा किस्सा देखील सांगितला.
हा किस्सा सांगतानाच त्यांनी माझं ऐकणाऱ्यांचा राजकारणात फायदा होतो, असं म्हणत थेट विश्वजीत कदम आणि अमित देशमुख यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे आता अजितदादांनी या दोघांना एकप्रकारे पक्षात येण्याची थेट ऑफरच दिल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अजितदादा नेमकं काय म्हणाले?
सभागृहात बोलताना अजित पवार म्हणाले, “2019 ला अण्णा बनसोडे यांनी माझ्या सांगण्यावरून फॉर्म भरला आणि ते 17 हजार मतांनी निवडून आले आणि आज उपाध्यक्ष झाले. त्यामुळे मला सभागृहाला आणि विशेषत: राष्ट्रवादीच्या मागे बसणाऱ्यांना सांगायचं आहे की, त्यावेळी अण्णांनी माझं ऐकलं आणि एबी भरला म्हणून बरं झालं.
माझं ऐकलं म्हणून ते त्यावेळी आमदार आणि आज उपाध्यक्ष झाले. राजकारणात माझं ऐकलं की कुणाचं किती भलं होतं ते बघा, ते आता बऱ्याच जणांच्या लक्षात आलं आहे, असं ते यावेळी म्हणाले. तसंच यावेळी अजितदादांनी काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि अमित देशमुख यांच्याकडे बघत हात जोडले आणि हसत म्हणाले, “सन्माननीय विश्वजीतची आणि सन्माननीय अमितजी आपण नेहमीच सतत चर्चा करतो.
मात्र, यातला गंमतीचा भाग जाऊद्या,असं म्हणत त्यांनी या दोघांकडे बघत अधिकचं बोलणं टाळलं. मात्र, अजितदादांनी यावेळी या दोन्ही नेत्यांचा उल्लेख का केला? त्यांना याआधी विधानसभेला पक्षात येण्याची ऑफर दिली होती की आता भविष्यात त्यांना पक्षात घेण्यासाठी अजितदादा फिल्डिंग लावत आहेत? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.