
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
शेतकऱ्यांच्या तोंडातला घास गळून पडला; नुकसान भरपाईसाठी तहसीलदारांना झोला गावकऱ्यांचे निवेदन
गंगाखेड: दिनांक ०३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपासून गंगाखेड तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. विशेषतः झोला पिंपरी परिसरात या वादळाचा मोठा फटका बसला असून, या भागात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करण्यात आलेली होती. या अवकाळी पावसामुळे व वादळामुळे उभ्या केळीच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या केळीच्या झाडे जमीनदोस्त झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांना निवेदन देत तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या निवेदनात राजाराम आंधळे, विष्णू आंधळे, नरसिंह आंधळे, श्रीधर आंधळे, दादाराव आंधळे व रामराव आंधळे यांचे नाव नमूद असून, त्यांनी आपले आर्थिक व मानसिक दुःख व्यक्त केले आहे.
गंगाखेड तालुक्यात अशा प्रकारचे हवामान अलीकडे वारंवार दिसून येत असून, यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत गंभीर बनत चालली आहे. केळीच्या पिकावर खर्च करून शेवटच्या टप्प्यातील उत्पादनाच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना या वादळामुळे मोठा धक्का बसला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई न दिल्यास शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे, व त्यामुळे आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाकडे ढकलले जाऊ शकते, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शासन व प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत व आधार देणे गरजेचे आहे. झोला गावकऱ्यांची ही मागणी आता संपूर्ण तालुक्याच्या शेतकऱ्यांची आशा ठरत आहे.