
‘मेन रोड तो झाकी है, पुरा शहर खोदना बाकी है’, महानगरपालिकेच्या विरोधात लक्षवेधी व खोचक नारा देऊन जनविकास सेनेने गांधी चौकातील मनपा इमारती समोर उभ्या असलेल्या महानगर पालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांच्या चार चाकी वाहनावर खेळण्यातील नकली नोटांची उधळण केली.
जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी लाल ब्रिफकेस मध्ये आणलेल्या या नकली नोटा जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्ताच्या वाहनावर उधळल्या.
केवळ कमिशनच्या हव्यासापोटी व मर्जीतील कंत्राटदाराच्या हितासाठी मनपातर्फे 506 कोटी रुपयांची नवीन भुमिगत गटार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी केवळ मुख्य रस्तेच नाही तर संपूर्ण शहरातील रस्ते पुन्हा एकदा खोदण्यात येतील असा दावा जनविकास सेनेने केला आहे. नवीन गटर योजनेच्या खोदकामाला तातडीने स्थगिती देण्यात यावी व या योजनेच्या निविदा प्रक्रियेतील 50 कोटी रुपयांच्या गैर-व्यवहाराची चौकशी करण्यात यावी तसेच 15 वर्षांपूर्वी काम झालेल्या 100 कोटी रुपयांच्या जुन्या भूमिगत गटार योजनेचे काय झाले ? याची, 234 कोटी रुपयांची पहिली अमृत पाणीपुरवठा योजना व मनपातील इतर सर्व घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी जनविकास सेनेने मागणी केली आहे. माजी नगरसेवक देशमुख यांनी मनापातील कोट्यवधी रुपयांच्या अनेक घोटाळ्यांची पुराव्यासह शासन-प्रशासनाकडे तक्रार केली. शासनाने काही निविदा रद्द केल्या, परंतु दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध अद्याप कारवाई थंडबस्त्यात आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवणार एक लक्ष सह्यांचे पत्र
जनविकास सेनेने आज शहरातील गांधी चौकातून महा-स्वाक्षरी अभियानाची सुरुवात केली. या अभियानाला रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी उत्सूर्फ प्रतिसाद दिला. गोल बाजार व मुख्य रस्त्यावरील दुकानातही स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. पहिल्या दिवशी 1000 च्या जवळपास नागरिकांनी या महा-स्वाक्षरी अभियानामध्ये सहभाग घेतला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरातील एक लक्ष नागरिकांच्या सह्यांचे पत्र पाठविण्यात येणार आहे. पुढील काही दिवस संपूर्ण शहरात पदयात्रा व कॉर्नर सभा घेऊन एक लक्ष सह्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल अशी माहिती देशमुख यांनी दिली. चंद्रपूरकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधींना सोडणार नाही असा इशाराही देशमुख यांनी आंदोलनप्रसंगी दिला.
महा-स्वाक्षरी अभियानासाठी मनिषा बोबडे, अक्षय येरगुडे, निर्मला नगराळे, प्रफुल बैरम, इमदाद शेख, अजित दखने, दिलीप होरे, सुरेश विधाते, किशोर जामदार, अशोक दिघिकर, देवराव बोढे, अजय महाडोळे,कुशाब कायरकर, सुधाकर मत्ते, पुरषोत्तम सोयाम आदीचीं उपस्थिती होती.