
आमदार निवासात कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू…
मुंबईतील आमदार निवासातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुंबईतील आकाशवाणी शेजारी असलेल्या आमदार निवासात वेळेवर रुग्णवाहिका न पोहोचल्याने एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे
या आमदार निवासात आमदारांच्या राहण्याची सोय केली जाते. राज्यभरातील आमदार काही कारणास्तव मुंबईला किंवा विधानसभेत आल्यावर त्यांच्यासाठी आमदार निवासात राहण्याची सोय असते. अशाच ठिकाणी रात्री 12.30 वाजता वेळेत रुग्णवाहिका न पोहोचल्याने एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे.
आमदार निवासात बऱ्याचदा आमदारांच्या मतदारसंघातील लोकही राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत धोत्रे कोर्टाच्या कामासाठी मुंबईत आले होते. त्यामुळे ते आमदार विजय देशमुख यांच्या खोली क्रमांक 408 मध्ये थांबले होते. रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांनी रुग्णवाहिकेला फोन केला.
पण ती उपलब्ध झाली नाही. खूप शोधाशोध केल्यानंतर शेवटी आमदार निवासानजीक असणाऱ्या पोलिसांच्या 2 नंबरच्या गाडीतून चंद्रकांत धोत्रे यांना जी. टी. रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांना दाखल होण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आलं. चंद्रकांत धोत्रे यांच्या कुटुंबीयांनी याबाबत कोणतीही तक्रार दिलेली नाही. त्यामुळे एडीआर झालेला नाही. धोत्रे यांचा मृतदेह घेऊन नातेवाईक गावी जाण्यासाठी रवाना झाल्याची माहिती आहे