
अधिकार मिळत नसल्याने राज्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जाणार…
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. त्यानंतर मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचा प्रकार समोर आला आहे. महायुतीमधील मंत्र्यांमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे.
राज्यातील राज्यमंत्री प्रचंड नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्याला कारण कॅबिनेट मंत्री आहेत. कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकाराचे वाटप केले नाही. त्यामुळेच आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आरोग्य सन्मान पुरस्काराच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहिल्या. या घटनेनंतर अनेक राज्यमंत्र्यांनी खासगीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता सर्व राज्यमंत्री एकत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ ५ डिसेंबर २०२४ रोजी घेतली. त्यानंतर दीर्घ कालावधीनंतर मंत्र्यांचा शपथविधी झाला. मग खातेवाटप रेंगाळले होते. त्यानंतर पालकमंत्री पदाची जबाबदारी लवकर दिली गेली नाही. जबाबदारी दिल्यानंतर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रीपदवरुन वाद सुरु झाला. हा वाट अजूनही मिटलेला नाही. तसेच धाराशिवमध्येही पालकमंत्रीपदावरुन भाजप व शिवसेनेत वाद सुरु झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पालकमंत्रीपदावरुन हटवण्याची मागणी भाजप करत आहे. आता कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्यातील वाद समोर आला आहे.
फडणवीस यांचा आदर्श इतरांनी घेतला नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे गृहखाते ठेवले आहे. त्यांनी गृह मंत्रालयाच्या अधिकाराचे वाटप करत काही अधिकार राज्यमंत्री योगेश कदम यांना दिले आहेत. यामुळे शिवसेना गटातून मंत्री झालेले योगेश कदम अनेक प्रकरणात थेटपणे भूमिका मांडत आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांप्रमाणे अधिकार इतर कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना दिले नाही. यामुळे राज्यमंत्री नाराज आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणात लक्ष द्यावे, या मागणीसाठी सर्व राज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.
राज्यात महायुतीच्या मंत्रिमंडळात ३९ मंत्री होते. त्यातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर ही संख्या ३८ झाली आहे. शिवसेनेचे ११, राष्ट्रवादीचे ८ आणि भाजपचे १९ मंत्री आहेत. यामध्ये अधिकारवाद सुरु झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा विषय कसा सोडवता? याकडे लक्ष लागले आहे.