
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :उदगीर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकावरील कारभार सध्या प्रवाशांना नाहक त्रासदायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकावरील अकार्यक्षम व्यवस्थेमुळे प्रवाशांची तारांबळ उडाली असून, नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
बातमीची दखल घेतल्यानंतर कर्नाटक, तेलंगणा व आंध्रप्रदेशातील एसटी बसना प्रवेश मिळवून दिला असला तरी बसस्थानकात मूलभूत सुविधा अजूनही धोकादायक स्थितीत आहेत.
प्रमुख समस्या खालीलप्रमाणे:
1. CCTV कॅमेरे चालू असून बंद – सुरक्षा धोक्यात:
गेल्या आठवड्यापासून बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरा कुणीकडे पाहत आहे हे कळत नाही. रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत धोकादायक आहे.
2. अपुरी लाईट व्यवस्था:
रात्रीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर अंधार असतो. विशेषतः लांब पल्ल्याच्या म्हणजे लातूर व अहमदपूरच्या गाड्या ज्या फलाटांवर लावल्या जातात, तिथे ना लाईट आहे ना सुरक्षा कॅमेरे.
3. बसचालकांची बेफिकिरी:
काही बसचालक बस थांबवण्यासाठी विशिष्ट जागेऐवजी मनासारख्या ठिकाणी बस थांबवत आहेत. त्यामुळे प्रवाशांना चढण्या-उतरण्यास त्रास सहन करावा लागत आहे.
4. वेळापत्रकाचा गोंधळ:
काही बसेस वेळेवर येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि प्रवाशांचा वेळ वाया जात आहे.
5. प्रशासनाचे दुर्लक्ष:
स्थानक प्रमुख किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. एक तर संबंधितांना विनंती केली जाते पण ती ऐकून घेतली जात नाही, अन्यथा तोंडदेखले उत्तर दिले जाते.
प्रवाशांचा रोष आणि मागणी:
स्थानिक पत्रकार रामविलास नावदर यांनी या संदर्भात समाजमाध्यमांवरून आवाज उठवला आहे. त्याचबरोबर प्रवाशांनीही आवाज उठवून प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. बसस्थानकात सीसीटीव्ही कार्यान्वित करणे, लाईटची व्यवस्था करणे, बसचालकांना शिस्त लावणे आणि प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे या गोष्टी तातडीने व्हाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
स्वारगेट सारखी घटना टाळण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत :
स्वारगेट बसस्थानकावर घडलेली घटना अजून ताजी आहे. उदगीर स्थानकात देखील अशा परिस्थिती निर्माण होऊ नयेत, यासाठी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना आवश्यक आहेत.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर भविष्यात कुठलीही अप्रिय घटना घडल्यास त्याची जबाबदारी स्थानक प्रशासनाचीच राहील, हे विसरून चालणार नाही.