
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : श्रीराम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत यंदा एक वेगळा सामाजिक आदर्श घालून देत संभाजी ब्रिगेडने मिरवणुकीतील सहभागी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि फळांची व्यवस्था करून सामाजिक भानाचे दर्शन घडवले. उन्हाच्या तीव्रतेत मिरवणुकीत चालणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरली.
संभाजी ब्रिगेड ही केवळ आंदोलन करणारी संघटना नसून समाजाच्या गरजांनुसार सातत्याने विधायक उपक्रम राबवणारी संघटना आहे, हे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले. महामानवांच्या जयंती, उत्सव, मिरवणुका अशा विविध प्रसंगांमध्ये शिवभोजन खिचडी वाटप, गरजूंना वह्या-पुस्तकांचे वाटप, रुग्णांना फळे देणे, गरीब कुटुंबांना लग्न साहित्य पुरवणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा उपक्रमांच्या माध्यमातून ब्रिगेडने समाजासाठी झटणारी संघटना म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
या मिरवणुकीत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राजकुमार माने, विधानसभा अध्यक्ष शिवश्री उत्तम फड, जिल्हा सचिव शिवश्री मोहनेश्वर विश्वकर्मा, कार्याध्यक्ष शिवश्री बाळासाहेब चिंचोलकर, जिल्हा संघटक महबूब सय्यद, जिल्हा सहसचिव व्यंकट थोरे, तालुका अध्यक्ष शिवश्री राजकुमार भालेराव, तालुका कार्याध्यक्ष नरसिंग बनशेळकेकर, सचिव सावंत तोरणेकर, सहसचिव दीपक गायकवाड, मनोहर हिंडे, संतोष पांढरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक संस्थांचा सहभाग
या उपक्रमात श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवश्री सतीश राजेंद्र पाटील, छावा संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील, बिपिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते शंकर मोरे, डॉ. आचवले सर, कृष्णा गिरी, राहुल आतनुरे, बाबासाहेब सूर्यवंशी, अंकुश ताटंपल्ले, राम रावणगावे, दिगंबर माने, अभिजीत पाटील, सचिन बिरादार यांचाही मोलाचा सहभाग होता.
विचारांचा वारसा आणि सामाजिक बांधिलकी
संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असून, सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत आहे. गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या आणि वंचितांच्या हक्कांसाठी या संघटनेने नेहमीच आवाज उठवला आहे.
श्रीराम जन्मोत्सव मिरवणुकीत फळे आणि पाण्याचे वाटप करून संभाजी ब्रिगेडने पुन्हा एकदा सिद्ध केले की, उत्सवाच्या वेळीही समाजसेवेचा मंत्र विसरता कामा नये. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, समाजासाठी कार्य करणाऱ्या संघटनांचा हा आदर्श निश्चितच अनुकरणीय आहे.